घराचे बांधकाम झाले महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST2020-12-04T04:24:29+5:302020-12-04T04:24:29+5:30
नागपूर : लॉकडाऊनंतर मुद्रांक शुल्क आणि सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ ग्राहकांना मिळत असल्याने घरांची मागणी वाढली आहे. ...

घराचे बांधकाम झाले महाग
नागपूर : लॉकडाऊनंतर मुद्रांक शुल्क आणि सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ ग्राहकांना मिळत असल्याने घरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला वेग आला आहे. पण गेल्या काही दिवसापासून बांधकाम साहित्याचे दर महागल्याने घराचे बांधकामही महाग झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. लॉकडाऊननंतर सर्वच बिल्डर्सनी बांधकाम सुरू केल्याने स्टील बारसह सर्वच बांधकाम साहित्याची मागणी अचानक वाढली आहे.
लॉकडाऊनपूर्वी सिमेंटचे दर दर्जानुसार २७० ते ३०० रुपये होते. मध्यंतरी कंपन्यांनी कार्टेल केल्यानंतर ३७० रुपयापर्यंत पोहोचले होते. आता ३०० ते ३३० रुपये प्रति बोरी भाव आहेत. स्टील बारच्या किमतीने बांधकामाच्या महागाईत भर टाकली आहे. जवळपास २० दिवसात प्रति टन २ हजार रुपयाची वाढ झाली आहे. गुरुवारी ८ एमएम स्टील बारची किंमत १८ टक्के जीएसटी वगळता ठोक बाजारात ४० हजार ५०० रुपयावर गेली आहे. याशिवाय १०, १२, १६, २० आणि २५ एमएम स्टील बारची किंमत ३९ हजार ५०० रुपयावर पोहोचली आहे. या किमतीवर १८ टक्के जीएसटी वेगळा लागणार आहे. मागणी वाढल्यानंतर पुढे दरवाढीची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.
तज्ज्ञांनी सांगितले की, स्टील बारचे दर आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतात. चीन आंतरराष्ट्रीय बाजारातून लोखंडाची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्याने आणि तुटवडा झाल्याने भाववाढ झाली आहे. या क्षेत्रातील स्टील उत्पादक जास्त दरात कच्चा माल खरेदी करीत असल्याने फिनिश माल जास्त भावात विकावा लागत आहे. भाववाढीच्या प्रारंभिक टप्प्यात सरकारने हस्तक्षेप करावा, शिवाय आयरन ओअरच्या निर्यातीवर प्रतिबंध आणावा, अशी उत्पादकांची मागणी आहे. मागणी आणि पुरवठ्यातील अंतर कमी झाल्यास भाव आपोआप कमी होतील.
जवळपास दीड वर्षांपासून रेतीघाटाचे लिलाव न झाल्याने रेती अनधिकृत वाहतूक वाढली आहे. त्यामुळे रेतीचे भाव तिप्पट वाढले आहेत. ८ हजारात ४०० चौरस फूट रेतीच्या डम्परचे भाव आता २५ ते २६ हजार रुपयावर पोहोचले आहेत. त्यामुळे बांधकामाचेही दर वाढले आहेत. याशिवाय लॉकडाऊनपूर्वी आणि नंतर विटा व गिट्टीचे भाव स्थिर आहेत.
बांधकाम साहित्य लॉकडाऊनपूर्वी लॉकडाऊननंतर
स्टील बार ३७ ते ३८ हजार ४० ते ४१ हजार
(१८ टक्के जीएसटी अतिरिक्त)
रेती (डोझर) २५ हजार २६ हजार
गिट्टी (डोझर) ८,५०० ९ हजार
विटा (हजार) ६ हजार ६ हजार