बाळासाहेब थोरात यांना गंभीर दुखापत, उपचाराकरिता रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:14 IST2022-12-26T13:14:27+5:302022-12-26T13:14:52+5:30
पुढील उपचाराकरिता मुंबईला रवाना

बाळासाहेब थोरात यांना गंभीर दुखापत, उपचाराकरिता रुग्णालयात दाखल
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना गंभीर दुखापत झाल्याने प्रचंड वेदना असलेल्या अवस्थेत त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे हलविण्यात आले. तेथे सर्व तपासण्या झाल्यानंतर त्यांना मुंबईला रेफर करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
बाळासाहेब थोरात आज (दि. २६) पहाटे मॉर्निंग वॉक करिता गेले असता पाय घसरून पडले. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले. तत्पूर्वी त्यांना अधिवेशनासाठी तैनात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले होते. मेयो येथे उपचारानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता मुंबईला हलविण्यात येणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
थोरात यांना नागपूर विमानतळावर नेण्यात आले असून विमानाने मुंबईला नेले जाणार असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रणिती शिंदे, यशोमाती ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन थोरात यांची भेट घेत विचारपूर केली.