व्होटबॅंक डोळ्यासमोर ठेवूनच कॉंग्रेसने भगव्या दहशतवादाचे षडयंत्र रचले, मुख्यमंत्र्यांचा दावा

By योगेश पांडे | Updated: August 1, 2025 13:30 IST2025-08-01T13:09:38+5:302025-08-01T13:30:28+5:30

Nagpur : बेशिस्त वर्तन करणाऱ्या मंत्र्यांवर थेट कारवाई

Congress hatched a conspiracy of saffron terrorism with vote bank in mind, claims Chief Minister | व्होटबॅंक डोळ्यासमोर ठेवूनच कॉंग्रेसने भगव्या दहशतवादाचे षडयंत्र रचले, मुख्यमंत्र्यांचा दावा

Congress hatched a conspiracy of saffron terrorism with vote bank in mind, claims Chief Minister

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
व्होटबॅंक डोळ्यासमोर ठेवूनच कॉंग्रेसने भगव्या दहशवादाचे षडयंत्र रचले व त्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नाहक अडकविण्याचा प्रयत्न केला असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शुक्रवारी ते नागपुरात बोलत होते. 

मालेगाव बॉम्बस्फोटानंतर २००८ चे जे षडयंत्र होते ते सर्वांसमोर उघडे पडले आहे. त्यावेळच्या सरकारने मतांच्या राजकारणासाठी भगवा दहशतवाद हा शब्द तयार केले होते. १९९० च्या दशकाच्या अखेरच्या टप्प्यात संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना होत होत्या व इस्लामिक दहशतवाद हा जगात चर्चेचा विषय होता. त्यावेळी व्होटबॅंकेच्या स्वार्थातून हा प्रकार करण्यात आला होता. तशी थिअरी तयार करून लोकांना अटक करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचे हे षडयंत्र होते. मात्र खूप प्रयत्न करूनदेखील कुठलाही पुरावा जमा करू शकले नव्हते. याबाबत हळू हळू लोक बोलतील व अनेक गंभीर बाबी समोर येतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अनेक दहशतवादी घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचले होते. त्यातून इस्लामिक दहशतवाद हा नॅरेटिव्ह जगात तयार झाला होता. संपूर्ण मुस्लिमांना कुणीही दहशतवादी ठरविले नव्हते. मात्र सर्व हिंदूंना दहशतवादी ठरविण्यासाठी संपुआ व कॉंग्रेसने षडयंत्र रचले होते. त्यांनी पोलीस यंत्रणेतील तत्कालिन अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. पुरावे नसतानादेखील कारवाई करा असे अलिखित निर्देश देण्यात आले होते. मात्र काही अधिकारी या दबावाला बळी पडले नाहीत. आता याचा भंडाफोड झाला आहे. त्यावेळच्या देश व राज्यातील सरकारने हिंदूंना दहशतवादी ठरवून हिंदू संघटनांना संपविण्यासाठी प्रयत्न कसा केला होता हे जगासमोर येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये होते. त्यांच्याच सरकारने भगवा दहशतवाद हा शब्द आणला होता. तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आठवला नव्हता का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

बेशिस्त वर्तन करणाऱ्या मंत्र्यांवर थेट कारवाई
कोकाटे यांच्या बाबतीत जी घटना घडली त्यानंतर जनतेत रोष होता. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेअंती कोकाटे यांचे खाते बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी मंत्रीमंडळात कुठलाही दुसरा बदल होईल अशी शक्यता नाही. आम्ही जनतेच्या सेवेसाठी आलो आहे. आम्ही काय बोलतो, कसे वागतो हे जनता पाहत असते. त्यामुळे वागताना नियंत्रित वागले पाहिजे. आता मंत्रीमंडळातील कुठल्याही सदस्याने बेशिस्त वर्तन केले तर ते खपवून घेणार नाही व त्यांच्यावर कारवाई होईल. आम्ही तिघांनीही हे निश्चित केले आहे. हा सर्वांसाठी संकेत आहे, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. दरम्यान,  माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी काही कामासाठी माझी तीनदा भेट घेतली आहे. मात्र मंत्रीमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नसते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Congress hatched a conspiracy of saffron terrorism with vote bank in mind, claims Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.