नागपूर विद्यापीठात परीक्षांचा घोळ संपेना! अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2022 12:13 PM2022-05-07T12:13:24+5:302022-05-07T12:16:37+5:30

यासंदर्भात कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे.

confusion over students regarding online examinations in RTM Nagpur University | नागपूर विद्यापीठात परीक्षांचा घोळ संपेना! अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले

नागपूर विद्यापीठात परीक्षांचा घोळ संपेना! अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले

googlenewsNext
ठळक मुद्दे उच्च शिक्षणाची संधी हुकण्याची भीती

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. या पार्श्वभूमीवर अंतिम सत्र व वर्षाच्या विद्यार्थ्यांची चिंता वाढीस लागली आहे. परीक्षांना उशीर झाल्यावर निकालदेखील लांबतील. असे झाल्यास उच्च शिक्षण तसेच रोजगाराच्या संधी हातातून निसटण्याची त्यांना भीती वाटते आहे. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी आवाज उचलण्यास सुरुवात केली आहे.

नागपूर विद्यापीठ अद्यापही ‘ऑनलाईन’ की ‘ऑफलाईन’ या प्रश्नात अडकलेले आहे. ‘ऑफलाईन’ परीक्षांची तयारी जवळपास झाली असताना ‘ऑनलाईन’चा निर्णय घेण्यात आला होता. ‘ऑनलाईन’ परीक्षांसाठी आंदोलनेदेखील झाली, मात्र राज्यातील सर्व कुलगुरूंनी ‘ऑफलाईन’ परीक्षांची भूमिका घेतली. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे.

देशविदेशातील अनेक नामांकित संस्थांमध्ये उच्चशिक्षणासाठी बरेच विद्यार्थी इच्छुक आहेत. परंतु परीक्षा लांबल्या तर निकालदेखील उशिरा लागतील. त्यामुळे तेथील संधी हातातून जाण्याचा धोका आहे. महाराष्ट्रात सर्वच विद्यापीठाच्या परीक्षा लांबण्याची शक्यता असल्याने राज्यातील उच्चशिक्षणावर फारसा प्रभाव पडणार नसला तरी बाहेरील विद्यापीठांच्या वेळापत्रकाचे काय करायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावतो आहे. शिवाय अनेक विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस प्लेसमेन्ट’ मिळाले आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे निकाल उशिरा लागले तर निर्धारित वेळेत ते रुजू होऊ शकतील का ही चिंता त्यांना सतावते आहे.

लवकर वेळापत्रक जाहीर करा

परीक्षांवरून गोंधळ सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बघ्याचीच भूमिका घेतली होती. अखेर संबंधित संघटनेला जाग आली व शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. गेल्या काही काळापासून परीक्षेची प्रणाली व वेळापत्रक यावरून विद्यार्थी चिंतेत आहेत. अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आणि शिक्षणानंतरचे नियोजन करण्यात बराच मानसिक त्रास होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेत विद्यापीठाने लवकरात लवकर परीक्षा प्रणालीसंदर्भात निर्णय घ्यावा व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे,अशी मागणी महानगर मंत्री प्रियंका वैद्य यांनी केली.

Web Title: confusion over students regarding online examinations in RTM Nagpur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.