Maharashtra Assembly Election 2019 : कामठी, काटोल, रामटेकबाबत संभ्रम : भाजप-काँग्रेसचा सस्पेन्स कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:23 AM2019-10-03T00:23:06+5:302019-10-03T00:23:44+5:30

भाजपने बुधवारी रात्री जारी केलेल्या यादीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव नसल्यामुळे ते कामठीतून लढणार की काटोलमधून हा ‘सस्पेन्स’ कायम आहे. काँग्रेसमध्येही कामठीसाठी रस्सीखेच सुरू आहे तर रामटेकचा गड सर करण्यासाठी कुणाला सेनापती बनवायचे हे दोन्ही पक्ष ठरवू शकले नाहीत.

Confusion about Kamthi, Katol, Ramtek: BJP-Congress suspension perpetuated | Maharashtra Assembly Election 2019 : कामठी, काटोल, रामटेकबाबत संभ्रम : भाजप-काँग्रेसचा सस्पेन्स कायम

Maharashtra Assembly Election 2019 : कामठी, काटोल, रामटेकबाबत संभ्रम : भाजप-काँग्रेसचा सस्पेन्स कायम

googlenewsNext
ठळक मुद्देपूर्व, मध्य व दक्षिण-पश्चिममध्ये काँग्रेसही वेटिंगवर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिले असताना भाजप व काँग्रेसने आपल्या उर्वरित जागांवरील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. भाजपने बुधवारी रात्री जारी केलेल्या यादीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव नसल्यामुळे ते कामठीतून लढणार की काटोलमधून हा ‘सस्पेन्स’ कायम आहे. काँग्रेसमध्येही कामठीसाठी रस्सीखेच सुरू आहे तर रामटेकचा गड सर करण्यासाठी कुणाला सेनापती बनवायचे हे दोन्ही पक्ष ठरवू शकले नाहीत.
पूर्व नागपूर, मध्य नागपूर व दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसचा घोळ कायम राहिला. पूर्व नागपुरात अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, पुरुषोत्तम हजारे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. मध्य नागपुरात हलबा, मुस्लिम की युवक काँग्रेसचे बंटी शेळके असा पेच अखेरपर्यंत कायम राहिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघासाठीही उमेदवाराचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. २०१४ मध्ये बसपाकडून नागपूर लोकसभेची निवडणूक लढलेले मोहन गायकवाड यांचे नाव आश्चर्यकारकरीत्या चर्चेत आले. याशिवाय नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, प्रशांत पवार, रेखा बाराहाते, किशोर उमाठे, अशोकसिंग चव्हाण यांच्याही नावावर चर्चा झाली. रामटेकसाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसे व उदयसिंग यादव यांच्या नावावर रस्सीखेच सुरू होती तर कामठीसाठी जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर की सदस्य नाना कंभाले यावर चर्चा फिरत राहिली.
भाजपच्या पहिल्या यादीत बावनकुळे यांचे नाव नसल्याने ते काटोल येथून लढतील, अशी राजकीय गोटात चर्चा होती. त्यामुळे कामठी येथील भाजप कार्यकर्ते काहिसे नाराज होते. बावनकुळे काटोलमध्ये विजश्री खेचून आणतील असे पक्षाचे अंतर्गत सर्वेक्षण असल्याचे दाखले काहींनी दिले होते. बावनकुळे यांच्या ऐवजी कामठीतून बहुजन रिपब्लिक एकता मंचच्या संयोजिका अ‍ॅड.सुलेखा कुंभारे यांना मैदानात उतरविले जाईल अशी चर्चा होती. मात्र, बुधवारी यासंदर्भात कुंभारे यांनीही पत्रपरिषदेत कामठीतून बावनकुळे यांनीच लढावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे सांगितले.
काटोलसाठी नगर परिषदेचे सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर यांच्यासह माजी आमदार अशोक मानकर व ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे यांचे नाव स्पर्धेत होते. दरम्यान, बुधवारी सायंकाळी चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवारी सकाळी १० वाजता कामठी येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत व चरणसिंग ठाकूर यांच्या समर्थकांनी ठाकूर शुक्रवारी सकाळी ११ वाजता काटोल येथे उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

राष्ट्रवादीकडून देशमुख व घोडमारे यांची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी रात्री ६० उमेदवारांची यादी जाहीर केली. तीत काटोलमधून माजी मंत्री अनिल देशमुख व हिंगणा मतदारसंघातून माजी आमदार विजय घोडमारे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीने शहरात पूर्व नागपूरच्या जागेवर दावा केला आहे. काँग्रेसनेही अद्याप ही जागा जाहीर केलेली नाही.

शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांची बंडखोरी
रामटेकची जागा भाजपला सुटली असे दिसताच शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. जयस्वाल हे शुक्रवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रामटेक, काटोल व कामठी या जागांसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांना ‘वेटिंग’वर ठेवले आहे. त्यामुळे भाजप जयस्वाल यांना उतरवेल असा अंदाज लावण्यात येत होता. परंतु असे झाले नसल्याने जयस्वाल यांनी रामटेकमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसने पाठविले ‘एसएमएस’
काँग्रेसने बुधवारी रात्री उशिरापर्यंत उर्वरित उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. दिल्लीतील काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारी निश्चित झालेल्यांना रात्री उशिरा ‘एसएमएस’ पाठवून कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाकडून ही खबरदारी घेण्यात आली असल्याचेही सांगितले गेले.

Web Title: Confusion about Kamthi, Katol, Ramtek: BJP-Congress suspension perpetuated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.