राजकारण नाही : नियमित बिल भरणाऱ्यांनाही सवलतनागपूर : २००१ सालापासून ७५ हजार उपभोक्त्यांकडे पाणीपट्टीची थकबाकी आहे. यात झोपडपट्टीधारकांसह अपार्टमेंटमधील रहिवाशांचाही समावेश आहे. यामागे अनेक कारणे आहेत. परंतु यात कोणत्याही स्वरूपाचे राजकारण न करता थकबाकीला कायमचा पूर्णविराम देण्यासाठी पाणीपट्टीच्या थकबाकीवर ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी यांनी रविवारी मांडली.सभापतिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या सर्व १० झोनमध्ये प्रत्येकी दोन दिवस उपभोक्त्यांचा आढावा घेतला. यात २ लाख ७५ हजार उपभोक्ते पाणीपट्टीची रक्कम नियमित भरत असल्याचे निदर्शनास आले. परंतु ७५ हजार उपभोक्त्यांकडे अनेक वर्षांपासून पाणीपट्टीची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले. यातील काही जणांकडे २००१ सालापासूनची थकबाकी आहे. यामागील कारणांचा शोध घेतला असता दूषित पाण्याचा पुरवठा, अपुरा पाणीपुरवठा, जादा बिल, सरासरी अधिक बिल, अशी अनेक कारणे असल्याचे निदर्शनास आले. थकबाकी वसुलीसाठी ७,५०० उपभोक्त्यांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या, तसेच २१ हजार उपभोक्त्यांनी थकीत बिल भरले. परंतु त्यानंतरही ५४ हजार उपभोक्त्यांकडे अनेक वर्षांपासूनची थकबाकी कायम आहे. यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या चार दिवसात ३,५०० उपभोक्त्यांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. याचा महापालिका व उपभोक्ते या दोघांनाही लाभ होणार आहे. यात राजकारणाचा प्रश्नच निर्माण होत नाही. ज्या लोकांना पाणी मिळत नव्हते त्यांना पाणी मिळेल व महापालिकेला पाणीपट्टीतून महसूल प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नियमित बिल भरणाऱ्यांनही १० टक्के सूटथकबाकीदारांना एकमुस्त ५० टक्के रक्कम भरल्यास बिलाची पाटी कोरी होणार आहे. यासोबतच नियमित बिल भरणाऱ्यांवर अन्याय नको म्हणून त्यांनाही १० टक्के सवलत दिली जाणार आहे. यासंदर्भात २१ जूनला जलप्रदाय समितीची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत सूट देण्याच्या प्रस्तावावर चर्चा होईल. चार दिवसात बिल भरणाऱ्यांना १० टक्के तर ८ दिवसात बिल भरणाऱ्यांना ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जोशी यांनी दिली. अत्यंत चांगली योजना गतकाळात अनेक लोकांनी घरे विकत घेतली. परंतु जुन्या घरमालकांची अनेक वर्षांपासूनची थकबाकी आहे. त्यामुळे जुनी थकबाकी असल्याने नवीन घरमालकांना नळजोडणी मिळत नव्हती. त्यामुळे अशा ५४ हजाराहून अधिक लोकांचा दोष नसतानाही त्यांना पाणी मिळत नव्हते. त्यांना दिलासा मिळाला आहे. मी स्वत: हनुमाननगर झोनमध्ये भेट दिली असता, या लोकांनी या योजनेवर समाधान व्यक्त केले. यामुळे उपभोक्त्यांसोबतच महापालिकेलाही नियमित पाणीपट्टी मिळणार आहे. ही अत्यंत चांगली योजना आहे.-सुधाकर कोहळे, भाजप शहर अध्यक्ष व आमदार
थकबाकी संपविण्यासाठीच सवलत
By admin | Updated: June 20, 2016 02:57 IST