भूगर्भातील हालचालींनी वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 07:00 AM2020-06-25T07:00:00+5:302020-06-25T07:00:13+5:30

जून महिन्यात मुंबईत एक आणि गुजरातच्या राजकोट भागात तीनदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. एकाच महिन्यात भूगर्भातील या हालचालीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र शास्त्रज्ञ याकडे लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

Concerns raised by underground movements | भूगर्भातील हालचालींनी वाढविली चिंता

भूगर्भातील हालचालींनी वाढविली चिंता

Next

निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी अकोल्यापासून दक्षिणेकडे १२९ किमी अंतरावर सायंकाळच्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात मुंबईत एक आणि गुजरातच्या राजकोट भागात तीनदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. एकाच महिन्यात भूगर्भातील या हालचालीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, ही साधारण प्रक्रिया असून चिंतेचे कुठलेही कारण नाही. शास्त्रज्ञ याकडे लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
२३ जून रोजी अकोल्यापासून दक्षिणेकडे १२९ किमी अंतरावर झालेल्या भूकंपाची रिश्टर स्केलमध्ये तीव्रता ३.३ इतकी नोंदविली गेली. याच महिन्यात २ तारखेलासुद्धा ३.४ तीव्रता असलेल्या भूकंपाची नोंद झाली. विशेष म्हणजे १० जून रोजी मुंबईच्या पश्चिमेकडे ७८ किमी दूर ३.० तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली, तर गुजरातच्या राजकोट येथे १४ जूनला ५.३, १५ जूनला दोनदा ४.१ व ३.५ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.

भूगर्भ सर्वेक्षण विभागा(जीएसआय)चे नागपूरचे संचालक विशाल साखरे यांच्या मते, या तीव्रतेच्या भूकंपामुळे कुठलाही धोका नाही. तीव्रता ६ किंवा ७ च्या वर असेल तर चिंतेचे कारण ठरू शकते. ही भूगर्भात होणारी साधारण प्रक्रिया आहे. भूगर्भातील खडकांच्या हालचालीतून फॉल्ट रिअ‍ॅक्शन झाल्याने ऊर्जा बाहेर आली व त्यामुळे हे धक्के जाणवले. पण पृथ्वीच्या आवरणात मोठा बदल जाणवत नसून हे मोठ्या भूकंपाला कारणीभूत नाहीत, असा दावा त्यांनी केला. हे धक्के प्राथमिक तरंगातून निर्माण झाले आहेत, जे सामान्य असतात. सेकंडरी आणि सरफेस तरंग धोकादायक ठरतात; पण असे तरंग निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही. हो पण सतर्कता ठेवणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र नाही भूकंपप्रवण
जीएसआयच्या सर्वेक्षणात महाराष्ट्राची भूमी कुठल्याच अंगाने भूकंपप्रवण नाही. केवळ कोयना पात्राच्या भागात थोड्या फार हालचाली होत असतात. त्यामुळे १९९३ साली लातूर, किल्लारीला भूकंप आला होता. उर्वरित कुठेही अशी शक्यता नाही. याशिवाय जवळ असलेल्या गुजरातच्या कच्छचा प्रदेश भूकंपप्रवण आहे. देशात हिमालय आणि पूर्वोत्तर राज्य हे भूकंपप्रवण परिसरात येतात. मात्र या काही वर्षांत मोठा आघात झाला नाही, असे विशाल साखरे यांनी सांगितले. भूगर्भातील ऊर्जा बाहेर पडल्याने हा प्रकार घडला असून ही सामान्य बाब आहे. जीएसआयचे भूगर्भशास्त्रज्ञ याकडे लक्ष ठेवून आहेत. मात्र नागरिकांनी सतर्कता ठेवावी आणि सुरक्षेचे नियम अंगिकरावेत. आपत्ती निवारण दलानेही याबाबत जनजागृती करावी.
- विशाल साखरे, संचालक, जीएसआय, नागपूर

 

Web Title: Concerns raised by underground movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthquakeभूकंप