संगणक परिचालक संपावर; ग्रामस्थ वाऱ्यावर!

By गणेश हुड | Published: November 18, 2023 02:26 PM2023-11-18T14:26:32+5:302023-11-18T14:28:01+5:30

विविध दाखल्यांसह प्रमाणपत्रांसाठी गरजूची भटकंती

Computer operators on strike; Wandering of the needy for certificates with various documents | संगणक परिचालक संपावर; ग्रामस्थ वाऱ्यावर!

संगणक परिचालक संपावर; ग्रामस्थ वाऱ्यावर!

नागपूर : राज्यभरातील संगणक परिचालकांनी विविध प्रलंबित मागण्यांकरिता १७ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व ७६४ ग्रामपंचायतींमधून नागरिकांना मिळणाऱ्या विविध दाखल्यांचे वितरण थांबले आहे. तसेच ऑनलाईन कामेही ठप्प पडली आहेत.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नागरिकांना स्थानिक पातळीवरच विविध दाखल्यांसह आरोग्य कार्ड अर्थात आयुष्यमान योजनेचे कार्ड तयार करून मिळत आहेत. परंतु, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने संप पुकारल्याने ग्रामस्तरावरील कामे थांबली आहेत.

जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत सुमारे ६२७ वर संगणक परिचालक कार्यरत आहेत. यापैकी अनेकांकडे दोन-दोन ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला आहे. हे सर्व संगणक परिचालक मागील १२ वर्षांपासून कार्यरत आहेत. या संगणक परिचालकांच्या माध्यमातून ई-ग्राम स्वराज, महावन, १ ते ३३ दाखले, सीएससी ट्रान्जेक्शन टार्गेटची कामे, १ ते ३३ नमुने, ऑनलाईन कामे, आयुष्यमान कार्ड, जन्म-मृत्यू दाखले, ई-श्रम कार्ड आदी कामांशिवाय इतर ऑनलाईन व ऑफलाईन कामेही करण्यात येतात. परंतु यानंतरही त्यांना केवळ ६९३० रुपये इतके तुटपुंजे मानधन देण्यात येते. तेही वेळेवर मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळावे, यासाठी फाईल राज्याच्या वित्त विभागाकडे पाठविण्यात आली होती. परंतु त्यात त्रुटी काढण्यात आल्या. त्या त्रुटीची आजवर पूर्तता झालेली नाही. असे संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. संगणक ऑपरेटर यांच्या मागण्या शासन स्तरावर तातडीने निकाली काढाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांना नुकतेच निवेदन देण्यात आले होते.

१७ नोव्हेंबरपासून संगणक परिचालक संघटनांनी अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांच्या नेतृत्वात राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारले आहे. नागपूर जिल्ह्यातील संगणक परिचालक संपावर गेल्याने नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांसोबतच अनेक कामेही रखडल्याचा दावा संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष गणेश रहांगडाले यांनी केला आहे.

Web Title: Computer operators on strike; Wandering of the needy for certificates with various documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.