मृताकडे तिकीट न सापडल्यासही भरपाई देणे बंधनकारक : हायकोर्टाचा निर्वाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 21:00 IST2020-03-09T20:59:43+5:302020-03-09T21:00:38+5:30
रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीजवळ अधिकृत तिकीट आढळून आले नाही तरी वारसदारांना भरपाई अदा करणे आवश्यक आहे. कारण, अपघातामुळे मयत प्रवाशाजवळचे तिकीट हरवले जाऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी एका प्रकरणात दिला.

मृताकडे तिकीट न सापडल्यासही भरपाई देणे बंधनकारक : हायकोर्टाचा निर्वाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेअपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीजवळ अधिकृत तिकीट आढळून आले नाही तरी वारसदारांना भरपाई अदा करणे आवश्यक आहे. कारण, अपघातामुळे मयत प्रवाशाजवळचे तिकीट हरवले जाऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी एका प्रकरणात दिला.
वरुड, जि. वर्धा येथील संतोष देवतळे यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. पंचनाम्यात त्यांच्याजवळ रेल्वे प्रवासाचे अधिकृत तिकीट आढळून आले नाही. त्यामुळे रेल्वे दावा न्यायाधिकरणने वारसदार पत्नी रंजना, मुले रोहित, आदित्य व आई अनसूया यांना भरपाई नाकारली होती. त्यामुळे या वारसदारांनी उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून रेल्वे न्यायाधिकरणचा वादग्रस्त आदेश रद्द केला. तसेच, वरीलप्रमाणे सुधारित निर्वाळा देऊन वारसदारांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश मध्य रेल्वेला दिला. १५ ऑगस्ट २०१६ रोजी संतोष हा रेल्वेने नागपूर येथून सेवाग्रामला परत जात होता. त्याने या प्रवासाचे अधिकृत तिकीट खरेदी केले होते. रेल्वे सेवाग्रामला पोहचल्यानंतर संतोष खाली पडला. या दुर्दैवी घटनेमुळे त्याचा मृत्यू झाला. रेल्वे न्यायाधिकरणने वारसदारांचा भरपाईचा अर्ज ३१ डिसेंबर २०१८ रोजी फेटाळला होता.