वाणिज्य शाखेची ‘बल्ले बल्ले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 23:21 IST2019-05-28T23:20:06+5:302019-05-28T23:21:28+5:30

एरवी बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा वरचष्मा दिसून येतो. मात्र यंदा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सर्वांनाच धक्का देत अव्वल स्थान पटकाविले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विज्ञान शाखेचे निकाल प्रचंड घसरले आहेत. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही वाणिज्य, विज्ञान व कला शाखेत मुलींनीच पहिला क्रमांक पटकाविला आहे.

Commerce branch's 'balle balle' | वाणिज्य शाखेची ‘बल्ले बल्ले’

वाणिज्य शाखेची ‘बल्ले बल्ले’

ठळक मुद्देनिकाल घसरले : जिल्ह्याचा निकाल ८४ टक्के : ईशिका सतिजा ‘टॉप’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एरवी बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा वरचष्मा दिसून येतो. मात्र यंदा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सर्वांनाच धक्का देत अव्वल स्थान पटकाविले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विज्ञान शाखेचे निकाल प्रचंड घसरले आहेत. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही वाणिज्य, विज्ञान व कला शाखेत मुलींनीच पहिला क्रमांक पटकाविला आहे. निकालांनंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते.
शहरातील पहिले तिन्ही ‘टॉपर्स’ हे वाणिज्य शाखेतीलच आहेत. के.डी.एम.गर्ल्स कॉलेजमधील विद्यार्थिनी ईशिका सतिजा हिने ९६.३१ टक्के (६२६) गुण प्राप्त करीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. त्यापाठोपाठ डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुशी दायमा हिने ९६ टक्के (६२४) गुण प्राप्त करीत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी भूषण ढुमणे हा ९५.५३ टक्के (६२१) गुण प्राप्त करीत तृतीय स्थानावर राहिला.
विज्ञान शाखेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कनक गजभिये हिने ९४.७० टक्के (६१६) गुण मिळवीत प्रथम स्थान मिळविले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख फैझान शफी हा ९३.८४ टक्के (६१०) गुण मिळवीत द्वितीय क्रमांकावर आला. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अनुरागिनी पौनीकर ही ९३.१० टक्के (६०५) गुणांसह तृतीय स्थानी आली.
कला शाखेत हिस्लॉप महाविद्यालयाची विद्यार्थिनी पाखी मोर हिने ९५.६९ टक्के (६२२) गुण प्राप्त करीत प्रथम स्थान पटकाविले. हिस्लॉप महाविद्यालयाच्याच लक्ष्मीश्री अय्यर हिने ९४.९२ (६१७) टक्के गुण प्राप्त करीत दुसरे स्थान मिळविले. तर एलएडी महाविद्यालयाची ईशोदया गुप्ता ही विद्यार्थिनी ९४.१५ टक्के (६१२) गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली.
विभाग, जिल्ह्यात विद्यार्थिनींचीच बाजी
नागपूर विभागातून ७७,१३८ पैकी ६६,५८६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८६.३२ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ७८.८९ टक्के इतके आहे. नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर ३०,१२७ पैकी २६,७०७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८८.६५ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी ४.६५ टक्क्यांनी कमी आहे. नागपूर जिल्ह्यातून ८०.२७ टक्के मुले उत्तीर्ण झाली. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ८४.३२ टक्के इतका राहिला.

Web Title: Commerce branch's 'balle balle'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.