सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गात विदर्भाला मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर महिन्यात ९०,२०० रुग्णांची नोंद झाली असताना ऑक्टोबर महिन्यात ४१,७०० रुग्ण आढळून आले. मागील महिन्यात ४६.२६ टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. मृत्यूची संख्याही ४९ टक्क्याने कमी झाली. विशेष म्हणजे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६३ टक्क्यांवर गेले. मात्र विदर्भातील मृत्यूदर हा देश व राज्याच्या तुलनेत आजही जास्त आहे.
विदर्भाच्या ११ ही जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने वेग धरला होता. सप्टेंबर महिन्यात बाधितांच्या संख्येने नवे विक्रमही स्थापित केले होते. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यूच्या संख्येने आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे झाले होते. ऑगस्ट महिन्यात ४३,९८१ नवे रुग्ण तर १,२०२ मृत्यूची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात मात्र याच्या दुपटीने वाढ झाली. ९०,२०० रुग्ण व २,४२८ रुग्णांचे मृत्यू झाले. परंतु ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून या दोन्ही संख्येत घट दिसून आली. या महिन्यात ४१,७३० रुग्ण व ११९२ मृत्यूची नोंद झाली. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात ४८,४७० रुग्ण कमी झाले, तर १२३६ मृतांची घट झाली.
रिकव्हरी रेट ९०.६३ टक्के
विदर्भात शुक्रवारपर्यंत १,७२,००० रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. याचा रिकव्हरी रेट ९०.६३ टक्क्यांवर गेला. मागील तीन महिन्याची तुलना केल्यास ऑगस्ट महिन्यात ४३,९८१, सप्टेंबर महिन्यात ७७,५०० तर ऑक्टोबर महिन्यात ५७,७६८ रुग्ण बरे झाले आहेत.
मृत्यूदर मात्र राज्यापेक्षा जास्त
भारताचा मृत्यूदर शुक्रवारी १.४९ टक्के होता. राज्याचा २.६० टक्के तर विदर्भाचा मृत्यूदर या दोन्हीपेक्षा जास्त आहे. २.७१ टक्के आहे. विशेष म्हणजे, मागील दोन महिन्यापासून हा दर स्थिर असल्याने चिंता वाढविणारा आहे.