ट्रकची धडक, कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराचा मृत्यू
By दयानंद पाईकराव | Updated: June 23, 2024 20:37 IST2024-06-23T20:37:18+5:302024-06-23T20:37:26+5:30
पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १८४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

ट्रकची धडक, कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराचा मृत्यू
नागपूर: ट्रकने धडक दिल्यामुळे मध्यप्रदेशातून कामासाठी नागपुरात आलेल्या परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाला. ही घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. मोहम्मद अकील राजु शेख (२०, रा. बालाघाट मध्यप्रदेश, ह. मु. भिलगाव नाका नं. २, कामठी रोड, यशोधरानगर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या परप्रांतीय मजुराचे नाव आहे.
तो मजुरीसाठी मध्यप्रदेशातून नागपुरात आला होता. तो शनिवारी रात्री १०.४५ वाजता आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ४९, ए. डब्ल्यू-६९५९ मध्ये पेट्रोल भरण्यासाठी मोहम्मद अली पेट्रोल पंप येथे जात होता. दरम्यान कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कामठी रोड नागलोक बसस्टॉपसमोर मागुन येणारा ट्रक क्रमांक एम. एच. ३५, ए. जे-१३८३ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून मोहम्मद अकीलच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. जखमी मोहम्मद अकीलला उपचारासाठी कामठी मार्गावरील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी अमृत मोहम्मद अकील सोबत मजुरी करणारे फिर्यादी कन्हैय्यालाल कैलासप्रसाद यादव (३२, रा. नयनपूर वॉर्ड नं. १०, शांतीनगर मंडला मध्यप्रदेश, ह. मु. भिलगाव नाका नं. २) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १८४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.