नागपुरात महाविद्यालयाचा लाचखोर लिपिक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:08 AM2018-02-21T00:08:15+5:302018-02-21T00:11:15+5:30

बारावीच्या विद्यार्थ्याची अडवणूक करून परीक्षा वर्गाचे प्रवेशपत्र देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकाला एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी जेरबंद केले.

College clerk arrested while taking bribe in Nagpur | नागपुरात महाविद्यालयाचा लाचखोर लिपिक गजाआड

नागपुरात महाविद्यालयाचा लाचखोर लिपिक गजाआड

Next
ठळक मुद्देबारावीच्या विद्यार्थ्याची अडवणूक : प्रवेशपत्रासाठी दोन हजारांची मागतिली लाच : एसीबीने बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारावीच्या विद्यार्थ्याची अडवणूक करून परीक्षा वर्गाचे प्रवेशपत्र देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकाला एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी जेरबंद केले. कुलदीपसिंग हरभजनसिंग (वय ४३) असे आरोपीचे नाव आहे. तो बेझनबागेतील गुरुनानक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक आहे.
बुधवारपासून १२ वीची परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची लगबग वाढली आहे. गुरुनानक महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी (तक्रारदार) सोमवारी आपले प्रवेशपत्र घ्यायला महाविद्यालयात गेला. कुलदीपने त्याला तुझ्याकडे सहा हजार रुपयांचे महाविद्यालयीन शुल्क शिल्लक आहे. ते आणि दोन हजार आणखी दिल्याशिवाय परीक्षा वर्गाचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) मिळणार नाही, असे सांगितले. आठ हजार रुपये मागणाऱ्या कुलदीपने पावती मात्र सहा हजारांचीच मिळेल, असेही स्पष्ट केले. वरचे दोन हजार रुपये कशाचे, अशी विचारणा केली असता कुलदीपने ती लाच असल्याचेही निर्ढावलेपणाने सांगितले. त्याच्या उर्मट वर्तनामुळे विद्यार्थ्याने सरळ एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारकर्ता विद्यार्थी महाविद्यालयीन शुल्क आणि लाचेची रक्कम घेऊन मंगळवारी कुलदीपकडे गेला. कुलदीपने रक्कम स्वीकारताच बाजूला घुटमळत असलेल्या एसीबीच्या पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी, शिपाई दीप्ती मोटघरे, शालिनी जांभूळकर, नायक लक्ष्मण लक्ष्मण परतेकी आणि शिशुपाल वानखेडे यांनी कुलदीपच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याविरुद्ध जरीपटका ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
अनेकांची अडवणूक?
आरोपी कुलदीपने अशाप्रकारे अनेक विद्यार्थ्यांची अडवणूक करून त्यांच्याकडून लाच उकळल्याचा संशय आहे. एसीबी त्याला न्यायालयात हजर करून त्याचा पीसीआर मिळवणार असून, त्याने अशाप्रकारे किती जणांकडून लाच घेतली, त्याचीही चौकशी केली जाणार आहे.

Web Title: College clerk arrested while taking bribe in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.