कोराेनाच्या संक्रमणात कोंबड्यांची झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST2020-12-04T04:24:03+5:302020-12-04T04:24:03+5:30
अभय लांजेवार उमरेड : पायाला शस्त्र बांधल्यानंतर एकमेकांवर तुटून पडणारे कोंबडे. हुर्र...हुर्र करीत जल्लोष करणारी शेकडो बघ्यांची गर्दी. रक्तबंबाळ ...

कोराेनाच्या संक्रमणात कोंबड्यांची झुंज
अभय लांजेवार
उमरेड : पायाला शस्त्र बांधल्यानंतर एकमेकांवर तुटून पडणारे कोंबडे. हुर्र...हुर्र करीत जल्लोष करणारी शेकडो बघ्यांची गर्दी. रक्तबंबाळ होईस्तोवर कोंबड्यांची थरारक झुंज. सोबतीला त्याच परिसरात खुलेआम सुरू असलेला दारूचा ठिय्या आणि चारचौघात रंगलेली ५२ ताशपत्त्यांच्या जुगाराची मैफल, असा तिहेरी अवैध गोरखधंदा उमरेडपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या दहेगाव शिवारात खुलेआम सुरू आहे. दहेगाव शिवारामधील एका शेतात महिनाभरापासून हा अवैध बाजार मांडलेला दिसून येतो. नागपूर ते चिमूर, भिसी, भिवापूर, कुही, उमरेड आदी परिसरातील शेकडो नागरिकांची गर्दी या ठिकाणी गोळा होते. बुधवार, शुक्रवार आणि रविवार असा आठवड्यातील तीन दिवस हा गोरखधंदा येथे चालतो. वेगवेगळ्या ठिकाणाहून खास लढाईचे कातीचे कोंबडे आणले जातात. एकमेकांविरुद्ध लढाईसाठी लाखो रुपयाची पैज लागते. या संपूर्ण काळ्या कारभारात दलाल असतात. दलालांची टोळी यात सक्रिय असून मकरधोकडा पोलीस चौकीपासून काही अंतरावरच हा प्रकार सुरू आहे. या गोरखधंद्यावर कुणाची मेहेरबानी, असा सवाल विचारला जात आहे.
या गर्दीचे करायचे काय?
शेकडो नागरिकांची या ठिकाणी गर्दी उसळते. ना तोंडाला मास्क ना ठराविक अंतर एकमेकांना खेटून मांडीला मांडी लावत ‘रम’सोबत ‘रमी’चा डाव बेधडकपणे चालतो. एकीकडे उमरेड तालुक्याची आपत्ती व्यवस्थापन समिती थोडी जरी गर्दी असली तर फिजिकल डिस्टन्सिंगच्या नावाखाली पावत्या फाडतात. ही समिती केवळ उमरेड शहरापुरतीच मर्यादित आहे काय आणि या गर्दीचे करायचे काय, असा सवाल विचारला जात आहे.
---------------
महिला विकतात दारू
एकीकडे दोन कोंबड्यांची जबरदस्त झुंज सुरू असताना दुसरीकडे देशी-विदेशी दारूचीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. शिवाय दारू विक्रीसाठी महिला दिसून येतात. या गर्दीमध्ये आणि गोरखधंद्यात असंख्य तरुणाई सहभागी होत असल्याने उमरेडनजीकच्या युवकांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे.