CM देवेंद्र फडणवीसांनी पदवीधर मतदार यादीसाठी भरला अर्ज; आता पदाधिकाऱ्यांसमोर नोंदणीचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 22:11 IST2025-10-20T22:06:36+5:302025-10-20T22:11:57+5:30
मुख्यमंत्र्यांनी पदवीधर नोंदणीसंदर्भात मागील आठवड्यात झालेल्या भाजपच्या विदर्भस्तरीय बैठकीत सूचना केल्या होत्या

CM देवेंद्र फडणवीसांनी पदवीधर मतदार यादीसाठी भरला अर्ज; आता पदाधिकाऱ्यांसमोर नोंदणीचे आव्हान
योगेश पांडे
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून पुढील वर्षी होणाऱ्या विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीदेखील तयारी सुरू झाली आहे. भाजपने मतदारसंघात सात लाखांच्या नोंदणीचे टार्गेट ठरविले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी अद्यापही ही मोहीम गंभीरतेने घेतलेली नाही. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अगोदर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नोंदणीचा अर्ज भरल्याने आता या मोहिमेची गती वाढविण्याचे आव्हान पदाधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.
दिवाळीनंतर केवळ यावरच लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील निवडणुकीतील पराभवाचे शल्य नेत्यांना बोचत असून, वरिष्ठ पातळीवरूनदेखील याची तयारी करण्याचे निर्देश आले होते. त्याअंतर्गत माजी आमदार सुधाकर कोहळे यांची मतदार नोंदणी प्रमुख, तर सुधीर दिवे यांची मतदार नोंदणी सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोहळे यांनी सात लाख मतदारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना जास्तीत जास्त मतदारांचे अर्ज भरून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, असे उमेदवार वगळता काही जणांनी ही मोहीम गंभीरतेने घेतली नव्हती.
मुख्यमंत्र्यांनी पदवीधर नोंदणीसंदर्भात मागील आठवड्यात झालेल्या भाजपच्या विदर्भस्तरीय बैठकीत सूचना केल्या होत्या. नागपुरात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वत: यासाठी अर्ज भरून दिला आहे. यावेळी सुधाकर कोहळे, सुधीर दिवे, नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, गिरीश देशमुख, श्रीकांत आगलावे, माजी नगरसेवक नरेंद्र बोरकर, विष्णू चांगदे, रितेश गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व पदवीधरांपर्यंत पोहोचून अर्ज भरण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. तसेच तरुणाईवर लक्ष केंद्रित करण्यात यावे, अशी सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.