लिपिकाचा आठ कोटींंवर डल्ला, खोटी कागदपत्रे तयार करून अर्जदारांच्या रकमेची फेरफार 

By योगेश पांडे | Published: October 14, 2023 11:33 AM2023-10-14T11:33:24+5:302023-10-14T11:35:19+5:30

मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात ‘गोलमाल’ : नातेवाइकांच्या खात्यात रक्कम वळती 

Clerk defrauded of eight crores, manipulation of applicants' amount by creating fake documents | लिपिकाचा आठ कोटींंवर डल्ला, खोटी कागदपत्रे तयार करून अर्जदारांच्या रकमेची फेरफार 

लिपिकाचा आठ कोटींंवर डल्ला, खोटी कागदपत्रे तयार करून अर्जदारांच्या रकमेची फेरफार 

योगेश पांडे

नागपूर : मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील एका लिपिकाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे तब्बल ८ कोटींचा अपहार केला आहे. लिपिकाने स्वत:चे नातेवाईक, ओळखीचे लोक व संस्थांच्या खात्यात विविध अर्जदारांना नुकसानभरपाईच्या रूपात मिळणारी रक्कम वळती केली. या प्रकरणात चौकशी सुरूच असून घोटाळ्याची रक्कम ही आणखी वाढू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणात सदर पोलिस ठाण्यात पाच कंपन्यांसह तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिगंबर भोलानाथ डेरे असे संबंधित लिपिकाचे नाव असून तो सद्य:स्थितीत काटोल दिवाणी न्यायाधीश कार्यालयात कार्यरत आहे. ११ जून २०१२ ते ५ जुलै २०२३ या कालावधीत तो मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात लिपिक म्हणून कार्यरत होता. न्यायाधिकरणाते कोषागार लेखा खाते सांभाळण्याची जबाबदारी डेरेवर होती. न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर विमा कंपन्या एसबीआयच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करतात व त्यानंतर न्यायाधिकरणाच्या माध्यमातून संबंधित रक्कम याचिकांमधील अर्जदारांना वितरित केली जाते. ही रक्कम देण्याची जबाबदारीदेखील डेरेवरच होती. त्यासाठी संबंधितांच्या ओळखीचा पुरावा व पूर्व पावतीदेखील घेणे अनिवार्य होते. मात्र, डेरेने अनेक पक्षकारांच्या बाबतीत ही प्रक्रियाच केली नाही.

डेरेने स्वत:ची पत्नी, नातेवाईक, परिचयातील व्यक्ती व पाच कंपन्यांच्या खात्यात ८ कोटींहून अधिकची रक्कम परस्पर वळती केली. यातील एकानेही न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली नव्हती. यासाठी डेरेने खोटी कागदपत्रे तयार केली व त्यामाध्यमातून हा घोटाळा नियोजनबद्ध पद्धतीने राबविला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर न्यायाधिकरणाचे व्यवस्थापक अभय खसाळे यांच्या तक्रारीवरून सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे आहेत इतर आरोपी

या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर पाच कंपन्यांसह तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात दिगंबर डेरेची पत्नी राजश्री, पीतांबर मणीराम धारकर, आदेश पीतांबर धारकर, ओम दत्ता जरे, उज्ज्वला भीमराव भगत, रीना हरीश भगत, गोपाल दत्ता जरे, अपेक्स ट्रेडिंग, गंगा ट्रान्सपोर्ट, हार्दिक शुभेच्छा कॉटन प्रा.लि., डी.पी. एंटरप्रायझेस, हारू अँड धारू कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांचा समावेश आहे.

खोटे हिशेब अन् खोटी कागदपत्रे

हा घोटाळा कागदोपत्री दडपण्यासाठी डेरेने न्यायाधिकरणाच्या नोंदीमध्ये फेरफार केले, तसेच खोटे हिशेब दाखविले. त्याचप्रमाणे त्याने खोटी कागदपत्रेदेखील सादर केली. न्यायाधिकरणाच्या चौकशीतून या बाबी समोर आल्या असून अजूनही चौकशी सुरूच आहे. या प्रकरणात इतरही लाभार्थी असण्याची शक्यता असून यामुळे न्यायाधिकरण वर्तुळात मोठा हादरा बसला आहे.

असा उघडकीस आला घोटाळा

काही पक्षकार व वकिलांनी त्यांच्या बॅंक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम तसेच मुदत ठेव जमा झाली नसल्याची तोंडी तक्रार अधिकाऱ्यांकडे केली होती. याची चौकशी करण्यात आली तेव्हा डेरेने संबंधितांच्या खात्यात रक्कम वळती न करता इतर आरोपींच्या खात्यात रक्कम वळती केल्याची बाब समोर आली.

Web Title: Clerk defrauded of eight crores, manipulation of applicants' amount by creating fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.