नागपुरात घरमालकीणला देवघरात बंद केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 20:37 IST2018-03-26T20:37:25+5:302018-03-26T20:37:38+5:30
घरमालकीणला देवघरात बंद करून घरातील नोकराने रोख एक लाख तसेच सोन्याचांदीच्या दागिन्यांसह पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. वर्धमाननगरात रविवारी दुपारी ही घटना घडली.

नागपुरात घरमालकीणला देवघरात बंद केले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरमालकीणला देवघरात बंद करून घरातील नोकराने रोख एक लाख तसेच सोन्याचांदीच्या दागिन्यांसह पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. वर्धमाननगरात रविवारी दुपारी ही घटना घडली. अजित कामत (वय २६) असे आरोपी नोकराचे नाव असून, तो बिहारमधील रहिवासी आहे.
लकडगंजच्या पूर्व वर्धमाननगरात प्रग्नेश ठाकर यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या पत्नी पारूल (वय ५६) रविवारी दुपारी १२.४५ वाजता आपल्या देवघरात पूजा करीत होत्या. घरात त्यांचा विश्वासू नोकर अजित होता. दुसरे कुणीही घरात नसल्याची संधी साधून अजितने देवघराचे दार बाहेरून बंद केले आणि घरातील कपाट चावीने उघडून आतमधील १ लाख, ४०० रुपये तसेच सोन्याचांदीचे दागिने असा एकूण २ लाख ८७ हजार, १५४ रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. घरातील मंडळी बाहेरून आल्यानंतर देवघरात बंद असलेल्या पारूल यांना त्यांनी बाहेर काढले. त्यानंतर नोकराच्या दगाबाजीचा हा प्रकार उघडकीस आला. पारूल यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चोरटा अजित कामत आपल्या मूळगावी, बिहारमध्ये पळून गेला असावा,असा संशय आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.