नागपुरात बाराचा ठोका अन् भीम जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:49 IST2018-04-14T00:38:04+5:302018-04-14T01:49:53+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला इंदोरा बुद्ध विहार येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. यासोबतच शहरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक रॅली व मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुका (रॅली) संविधान चौकात एकत्र आल्या. निळ्या गुलालाची उधळण करीत ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संविधान चौक अक्षरश: दणाणून गेला. शुक्रवारी रात्री १२ च्या ठोक्याला फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

नागपुरात बाराचा ठोका अन् भीम जल्लोष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला इंदोरा बुद्ध विहार येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. यासोबतच शहरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक रॅली व मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुका (रॅली) संविधान चौकात एकत्र आल्या. निळ्या गुलालाची उधळण करीत ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संविधान चौक अक्षरश: दणाणून गेला. शुक्रवारी रात्री १२ च्या ठोक्याला फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
इंदोरा बुद्ध विहार कमिटी, अखिल भारतीय धम्मसेना आणि बेझनबाग बुद्ध विहारातर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ९.३० वाजता इंदोरा बुद्धविहार येथे बुद्धवंदनेने मिरवणुकीला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केल्यानंतर दहा नंबर पूल, कडबी चौक, गड्डीगोदाम, एलआयसी चौक असे मार्गक्रमण करीत रॅली संविधान चौकात पोहोचली. यासोबतच शहरातील विविध बुद्धविहार, संघटना, व सामाजिक संस्थांतफे रॅली काढण्यात आली. शहरातील चारही बाजूंनी निघालेल्या मिरवणुका संविधान चौकात पोहोचल्या. चौकातील महामानवाच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण चौक गर्दीने फुलून गेला होता. यावेळी भदंत ससाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्रिशरण पंचशीलाने रॅलीचा समारोप झाला. मिरवणुकीत भंते नागघोष, भंते नागधम्म, भंते नागसेन, भंते धम्मबोधी, भंते नागानंद, भंते धम्मकाया, भंते धम्मविजय, धम्मप्रकाश, भंते शिलानंद, संघमित्रा, संघशिला, यांच्यासह उपासक-उपासिका आणि हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते.