अवैध धंद्यांवर नागरिकांनी लक्ष ठेवावे!
By Admin | Updated: November 4, 2014 01:00 IST2014-11-04T01:00:13+5:302014-11-04T01:00:13+5:30
गावातील अवैध धंद्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील आणि त्या गावातील प्रत्येक नागरिकांची आहे. यासोबतच गावात अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास त्याची माहिती

अवैध धंद्यांवर नागरिकांनी लक्ष ठेवावे!
पोलीस अधीक्षक : मौदा पोलीस ठाण्यात पोलीस पाटील, नागरिकांशी चर्चा
नागपूर : गावातील अवैध धंद्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील आणि त्या गावातील प्रत्येक नागरिकांची आहे. यासोबतच गावात अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावी. त्यामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविता येईल, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी व्यक्त केले.
मौदा पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीमध्ये चिरव्हा, माथनी, गुमथळा, राहडी, पावडदौना, भूगाव, वरंबा, आसलवाडा, मांगली नांदा, रानमांगली, सुकळी, अंबाडी, एकर्डी, दिघोरी, सोनेगाव राजा, गारली, सावळी, दहेगाव, निहारवानी, धामणगाव, बोरगाव, महादुला, मोहखेडी, मोहाडी, नांदगाव, चितापूर, कुंभारी, मांगली गोसावी, नवेगाव (रेल्वे), कुंभापूर, शिवनी, चारभा, इटघाट, मोहगाव, सुंदरगाव, कोपरा, हिवराबली, डहाडी, भेंडाळा आदी गावातील पोलीस पाटील आणि नागरिक उपस्थित होते. यासोबतच पत्रकारांकडून परिसरातील समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासंबंधी त्यांनी आदेश दिले. यानंतर मौदा पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षकांनी पोलीस दरबार घेतला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलीस क्वॉर्टर निकामी, नादुरुस्त, पडक्या स्थितीत असल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी पोलीस वसाहतीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कांतेवार, चव्हाण, ढवळे, ठाणेदार गायगोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)