आदिवासी विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या चौकीदारास झाली जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:57 IST2025-08-05T14:55:45+5:302025-08-05T14:57:57+5:30
सत्र न्यायालयाचा निर्णय : बुटीबोरीतील शाळेच्या वसतिगृहात संतापजनक घटना

Chowkidar who tortured tribal students sentenced to life imprisonment
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे उराशी बाळगणाऱ्या स्वप्न अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम चौकीदाराला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली व एकूण १५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. ए. शेख यांनी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना बुटीबोरी येथील आहे.
होमदेव उत्तम पडोळे (३५) असे आरोपीचे नाव असून तो ब्राह्मणी, ता. पवनी, जि. भंडारा येथील मूळ रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो बुटीबोरी येथील एका इंग्लिश मीडियम शाळेच्या वसतिगृहात चौकीदार म्हणून काम करीत होता. पीडित मुली गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी आदिवासी विभागाच्या शैक्षणिक योजनेंतर्गत या शाळेत प्रवेश घेतला होता.
तसेच, त्या शाळेच्याच वसतिगृहात राहत होत्या. त्यांचा संपूर्ण खर्च सरकार उचलत होते. सरकारला त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे होते. परंतु, नराधम होमदेवची या विद्यार्थिनींवर वाईट नजर होती. तो कोणत्या ना कोणत्या कारणावरून विद्यार्थिनींना रागवायचा व मारहाण करायचा. त्यांना कोंबडा बनायला लावायचा. दरम्यान, त्याने सात मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. न्यायालयात सरकारच्या वतीने अॅड. प्रशांत साखरे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध ठोस पुराव्यांच्या आधारावर होमदेवला दोषी सिद्ध केले.
अल्पवयीन मुलामुळे कुकृत्य उघडकीस
- होमदेव वसतिगृहातील एका आदिवासी अल्पवयीन मुलावरही अनैसर्गिक अत्याचार करीत होता. एक दिवस तो मुलगा घरी गेला व त्याने शाळेमध्ये परत जाण्यास नकार दिला. पालकांनी सखोल विचारपूस केली असता त्याने होमदेवच्या सैतानी कृत्याची माहिती दिली.
- त्यानंतर होमदेवविरुद्ध पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. त्या प्रकरणात होमदेवला गेल्य जानेवारीमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे.
- पीडित मुलाच्या तक्रारीमुळे आदिवासी विभागाने सखोल चौकशी केली असता सात पीडित विद्यार्थिनींनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. परिणामी, होमदेवविरुद्ध १७ फेब्रुवारी २०१७ रोजी दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला होता.
आठ वर्षे चालला खटला
हा खटला निकाली निघण्यासाठी आठ वर्षे तीन महिने नऊ दिवसांचा कालावधी लागला. पोलिसांनी २६ एप्रिल २०१७रोजी हा खटला दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने २० ऑक्टोबर २०२१ रोजी होमदेवविरुद्ध आरोप निश्चित केले तर, १५ फेब्रुवारी २०२२ पासून पुरावे नोंदविण्यास सुरुवात झाली होती.
अशी आहे पूर्ण शिक्षा
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याकरिता जन्मठेप व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास.
ठार मारण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्याकरिता एक वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास.