महाराष्ट्रातील बालनाट्य चळवळी केवळ स्पर्धाजीवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST2021-02-14T04:09:03+5:302021-02-14T04:09:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बालरंगभूमीचा विचार केला असता महाराष्ट्रात बालनाट्य चळवळीचे अस्तित्त्व काय, बालकांनी नाटक करायचे म्हणजे त्याला ...

महाराष्ट्रातील बालनाट्य चळवळी केवळ स्पर्धाजीवी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बालरंगभूमीचा विचार केला असता महाराष्ट्रात बालनाट्य चळवळीचे अस्तित्त्व काय, बालकांनी नाटक करायचे म्हणजे त्याला बालरंगभूमी म्हणायचे का, ही चळवळ कशी काय असू शकते, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रातील बालनाट्य चळवळ ही केवळ स्पर्धेपुरती मर्यादित असून सांस्कृतिक संचालनालयाने बालनाट्य स्पर्धा बंद केल्या तर पितळ उघडे पडेल. त्यामुळे, महाराष्ट्रातील बालनाट्यचळवळ ही केवळ स्पर्धाजीवी असल्याचे मत प्रख्यात बालनाटककार व नाट्यसमीक्षक डॉ. सतीश साळुंखे यांनी व्यक्त केले.
बहुजन रंगभूमीच्यावतीने आयोजित द्विदिवसीय बालनाट्य महोत्सवाचा शुभारंभ शनिवारी ऊरुवेला कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात झाला. महोत्सवाच्या ‘बालरंगभूमीची आजची गरज’ या परिसंवादात महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून साळुंखे बोलत होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध नाट्यसमीक्षक डॉ. सतीश पावडे होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ नाटककार दादाकांत धनविजय, प्रभाकर दुपारे व बहुजन रंगभूमीचे वीरेंद्र गणविर उपस्थित होते.
बालरंगभूमी ही कलावंत घडण्याच्या काळातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असून, रंगभूमीने मनोरंजनापेक्षा अंजनाचे काम करणे अपेक्षित आहे. त्यासाठी रंगभूमीचा अर्थ बदलून ती विचारांची युद्धभूमी व्हायला हवी. प्रस्थापितांना बहुजन, दलितांचे प्रश्न मान्य नसल्याने या रंगभूमीने आत्मभान जागृत करण्याचे कार्य करावे, असे आवाहन साळुंखे यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना दादाकांज धनविजय यांनी रंगभूमीवर वावरताना बालकलावंतांनी समजून उमजून अनुकरण करावे आणि बालनाटककार ताकदीने उभा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रभाकर दुपारे यांनी बोलताना वय, काळ आणि ध्येयासोबतच स्पर्धेच्या युगाचा समन्वय साधूनच कलावंतांनी मार्गस्थ होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक वीरेंद्र गणवीर यांनी केले.
----------
पहिल्या दिवशी तीन नाटकांचे सादरीकरण
पहिल्या दिवशी बालनाट्यमहोत्सवात वीरेंद्र गणवीर लिखित तीन नाटकांचे सादरीकरण झाले. ‘थेंब थेंब श्वास’ या नाटकाचे दिग्दर्शन सुरेंद्र वानखेडे यांचे होते तर यात देव नन्नावरे, अनया शिंपी, ईश्वरी गोडबोले, दीपांशी मुरमाडे, कौशिक गणेशे यांच्या भूमिका होत्या. ‘घायाळ पाखरा’चे दिग्दर्शन रिशिल ढोबळे यांचे होते तर यात ओम राऊत, अनुष्का शेंडे, श्लोक पारवे, जिशांत मुरमाडे यांच्या भूमिका होत्या. ‘आम्हालाही पंख हवेत’चे दिग्दर्शन आशिष दुर्गे यांचे असून यात कौशिक गणेशे, पुण्या लारोकर, उन्नती गव्हाणे, पार्थ पवार, मुजफ्फर अहमद यांच्या भूमिका होत्या. बहुजन रंगभूमी, दी बुद्धिस्ट आर्ट थिएटर ऑफ इंडिया व अश्वघोष कला अकादमीच्या वतीने ही नाटके सादर झाली.
...............