नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘बालमजुरांच्या तस्करीचे रॅकेट सक्रिय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्तमालिकेमुळे संबंधित वर्तुळासह प्रशासनातही प्रचंड खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, आज अप्पर कामगार आयुक्तांनी 'लोकमत'च्या वृत्ताचा हवाला देत संबंधितांची तातडीने बैठक घेतली. त्यानंतर कोणीही बालकामगार किंवा किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे एका प्रसिद्धीपत्रकातून जाहीर केले.
विविध प्रांतातील गरिब पालकांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांच्या मुलांना नागपुरात आणले जाते आणि येथून त्यांना विविध ठिकाणी कामावर जुंपले जाते. गेल्या दोन महिन्यात अशा प्रकारचे दोन मोठे प्रकरण उघडकीस आले. त्यानुसार, अशाच प्रकारे बिहारमधील १२ ते १८ वयोगटातील ९ बालकांना त्यांच्या गावातून चांगल्या कामाचे आमिष दाखवून येथे पळवून आणण्यात आले. त्यानंतर नागपुरातील विविध ठिकाणी या बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर जुंपण्यात आले. त्यांच्याकडून अवजड काम करून घेण्यात येत होते आणि नकार दिल्यास मारहाण करून धमकावले जाते होते. परिणामी कंटाळलेली ही बालके १४ नोव्हेंबर २०२४ ला नागपूर रेल्वे स्थानकावर पळून आली. त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले आणि रेल्वे पोलिसांनी प्रमोद यादव (वय २४, रा. हेमंतपूर, जि. भोजपूर, बिहार) तसेच संजय यादव (वय २५, रा. भैरव टोला, भोजपूर) या दोघांना रेल्वेचे पोलीस निरीक्षक गाैरव गावंडे यांनी अटक केली. हे आरोपी सध्या कारागृहात आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशातील बालकांनाही अशाचप्रकारे एका ‘मामा’ने पळवून आणल्याचे उघड झाले. नागपूर विदर्भात अशा प्रकारे शेकडो बालकामगार राबत असून तशी अनेक प्रकरणे अंधारात आहेत. त्यावर प्रकाश टाकतानाच या गंभीर प्रकाराचा पर्दाफाश करणारे वृत्त 'लोकमत'ने बुधवारी आणि गुरुवारी (१४ आणि १५ जानेवारीला) ठळकपणे प्रकाशित केले. त्यामुळे प्रशासनासह संबंधितांनामध्ये एकच खळबळ उडाली. अनेक ठिकाणच्या बालमजुरांना कामाच्या ठिकाणावरून तात्पुरते हटविण्यात आल्याचेही सूत्रांकडून सांगितले जाते.
आठ दिवसांत १४ बालकामगारांची सुटका१ जानेवारी २०२५ ला जरीपटक्यात ३ बाल कामगारांची सुटका, २ जानेवारीला कळमन्यात ५ बालकामगार, ६ जानेवारीला कोराडीत ३ बालकामगार आणि ८ जानेवारीला पुन्हा जरीपटक्यात ३ असे एकूण आठ दिवसांत १४ बालकामगार नमूद ठिकाणी आढळले. बालकामगार विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन आणि पोलीस विभागाने ही संयुक्त कारवाई केली.
कारावास अन् दंडाचीही शिक्षाविशेष म्हणजे, बाल आणि किशोरवयीन कामगार प्रतिबंधक अधिनियम १९८६ नुसार, कारखाने, आस्थापना, धोकादायक उद्योग आणि प्रक्रियेच्या ठिकाणी कामावर बालकामगार ठेवल्यास संबंधित आस्थापना मालकास, नियुक्त करणारास ६ महिने ते २ वर्षेपर्यंत कारावास तसेच २० ते ५० हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
गेल्या वर्षभरात १६ प्रकरणे
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या वर्षभरात ठिकठिकाणी कारवाई केली असता तेथे १६ बालकामगार आढळले. खापा, बुटीबोरी, माैदा, कुही, कळमना जरीपटक्यात ही कारवाई अपर कामगार आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आली. यापुढे या प्रकारावर गंभीर लक्ष ठेवून कारवाई करण्यात येईल, असे कामगार आयुक्त के. व्ही. दहीफळकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
है तैय्यार हम !
कोणत्याही ठिकाणी बालकामगार आढळल्यास अपर कामगार आयुक्त, बालकामगार विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन किंवा पोलीस विभागाशी संपर्क करावा. आम्ही कारवाईसाठी सज्ज आहोत, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी म्हटले आहे.