भिंत अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 21:49 IST2021-05-21T21:44:37+5:302021-05-21T21:49:47+5:30
Child dies बांधकामस्थळी आपल्या मजूर आईसोबत आलेल्या चिमुकलीच्या अंगावर भिंत पडल्याने तिचा करुण अंत झाला.

भिंत अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बांधकामस्थळी आपल्या मजूर आईसोबत आलेल्या चिमुकलीच्या अंगावर भिंत पडल्याने तिचा करुण अंत झाला. विद्या निखिल पेटकर असे या चार वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. मानकापूर रिंग रोडवर राऊत लेआऊट आहे. तेथे एका ठिकाणी बांधकामाला सुरुवात झाली आहे. बेसमेंटमध्ये कच्चे काम सुरू आहे. या ठिकाणी सुरेखा आणि तिचा पती निखिल पेटकर (रा. राजनगर झोपडपट्टी) हे मजुरीच्या कामाला येतात. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुरेखा आपल्या चार वर्षाच्या विद्या नामक चिमुकलीला घेऊन बांधकामस्थळी आली. बेसमेंटमध्ये टिनाच्या शेडखाली विद्याला ठेवून सुरेखा काम करू लागली. पाऊस झाल्यामुळे बेसमेंटमध्ये माती भुसभुशीत झाली होती. त्यामुळे कच्ची भिंत उभारली जात असताना खालची माती खचून ही भिंत चिमुकल्या विद्याच्या अंगावर पडली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी मानकापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच ठाणेदार वैजयंती मांडवधरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी सुरेखा तसेच अन्य मजुरांकडून घटनेची माहिती घेतली. तूर्त या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.