'लोकशाहीतील संविधानिक मूल्यांचे पालन प्रामाणिकपणे करणार', मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
By आनंद डेकाटे | Updated: February 23, 2025 20:55 IST2025-02-23T20:55:21+5:302025-02-23T20:55:44+5:30
Nagpur News: राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ही मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना आपण लोकशाहीतील संविधानिक मूल्यांचे पालन व जतन प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी येथे व्यक्त केला.

'लोकशाहीतील संविधानिक मूल्यांचे पालन प्रामाणिकपणे करणार', मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
नागपूर - राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ही मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना आपण लोकशाहीतील संविधानिक मूल्यांचे पालन व जतन प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी येथे व्यक्त केला.
महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल रविवारी वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. बजाजनगर येथील करुणा सांस्कृतिक भवन येथे आयोजित अभिनंदन सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मानवाधिकार आयोगाचे सदस्य तथा माजी न्यायमूर्ती सी. एल. थूल होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त संजय मीणा आणि चेन्नईचे सीमा शुल्क आयुक्त राजेश ढाबरे उपस्थित होते. यावेळी फोरमच्या वतीने मानपत्र, स्मृतिचिन्ह व शाल देऊन दिनेश वाघमारे आणि त्यांच्या पत्नी ज्योती वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त वाघमारे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा यशाचा मूलमंत्र दिला आहे. त्यानुसार आपण शिकलो. आता आपल्या अधिकारासाठी आपल्याला संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज आहे. प्रशासकीय सेवेमुळे सर्वसामान्य लोकांना न्याय देता येतो. विविध क्षेत्रात काम करता येते. त्यामुळे तरुणांनी जास्तीत जास्त या सेवेत यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सी. एल. थुल, संजय मीणा, राजेश ढाबरे आणि ज्योती वाघमारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. संविधान प्रास्ताविकेचे वाचन सुकेशिनी तेलगोटे यांनी केले. बाबासाहेब देशमुख यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रस्ताविक डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन ललित खोब्रागडे यांनी केले. आशा कवाडे यांनी आभार मानले.
चोखामेळाची सुसज्ज इमारत उभी झाली, याचा आनंद
आपल्या प्रशासकीय सेवेच्या काळात ऊर्जा विभाग आणि सामाजिक न्याय विभागात सर्वाधिक सेवा देण्याची संधी मिळाली. यादरम्यान महाराष्ट्राचे ऊर्जा खाते देशात सर्वात पुढे होते. तर सामाजिक न्याय क्षेत्रात वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी मोठे काम करता आले. नागपुरातील चोखामेळा वसतिगृहात राहून मी शिकलो. त्यामुळे त्यांच्या अडचणींची चांगली जाणीव होती. चोखामेळा वसतिगृह नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला. आज या वसतिगृहाची अतिशय सुंदर व सुसज्ज अशी इमारत उभी झाली याचा आनंद असल्याचे दिनेश वाघमारे म्हणाले.