नागपुरात भूखंड विक्रीची बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 22:33 IST2019-08-24T22:32:31+5:302019-08-24T22:33:22+5:30

हुडकेश्वरमधील सख्ख्या भावाने त्याच्या भावाच्या भूखंडाची दुसऱ्या आरोपींना विक्री करून दिली तर, गिट्टीखदानमध्ये दोन आरोपींनी अस्तित्वात नसलेल्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून एका व्यक्तीला तो विकला आणि त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले.

Cheating in plots selling in Nagpur | नागपुरात भूखंड विक्रीची बनवाबनवी

नागपुरात भूखंड विक्रीची बनवाबनवी

ठळक मुद्देहुडकेश्वरमध्ये सख्ख्या भावाने केली फसवणूक : गिट्टीखदानमध्ये अस्तित्वात नसलेल्या भूखंडाची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वरमधील सख्ख्या भावाने त्याच्या भावाच्या भूखंडाची दुसऱ्या आरोपींना विक्री करून दिली तर, गिट्टीखदानमध्ये दोन आरोपींनी अस्तित्वात नसलेल्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून एका व्यक्तीला तो विकला आणि त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले. या दोन्ही प्रकरणात अनुक्रमे हुडकेश्वर आणि गिट्टीखदान पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
हुडकेश्वर
कृष्णा सीतारामजी काळबांडे (वय ७२, रा. रुक्मिणीनगर) आणि भास्कर सीतारामजी काळबांडे (रा. क्रीडा चौक, हुनमाननगर) या दोन भावांची बी. एस. काळबांडे नावाची फर्म होती. या दोघांच्या वडिलांची जी मालमत्ता होती, तिची सीतारामजी काळबांडे यांनी स्वत:च्या हयातीत हिस्सेवाटणी करून दिली होती. कृष्णा आणि भास्कर हे दोघे भाऊ १९९३ पासून वेगवेगळे राहू लागले.
बी. एस. फर्मवर असलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी भास्कर काळबांडेने मौजा नरसाळा येथील ३ हजार चौरस फूट जमीन १४ जून २००६ ला कृष्णा काळबांडे यांच्या नावाने करून दिली. त्यानंतर काही दिवसांनी या भूखंडाचे कागदपत्र हरविल्याचे खोटे शपथपत्र तयार करून सह निबंधक कार्यालयातून भूखंडाची प्रमाणित प्रत काढली आणि हा भूखंड भास्करने उदयभान काशीरामजी वासनिक (रा. सर्वोदय ले आऊट, चांदमारी मंदिर रोड, नागपूर) याला आणि वासनिक याने राकेश नारायण गोसेकर (रा. आदमशहा ले आऊट, गणेश नगर, नागपूर) याला विकला. काही दिवसांपूर्वी कृष्णा काळबांडे आपल्या भूखंडावर गेले असता त्यांना तेथे राकेश गोसेकरच्या नावाचा फलक दिसला. आपल्या भूखंडावर गोसेकरचा फलक कुणी लावला, अशी विचारणा कृष्णा यांनी भास्करला केली असता त्याने खरी माहिती सांगण्याऐवजी तुझ्याने जे होते, ते करून घे, असे म्हटले. सख्ख्या भावाने फसवणूक केल्यामुळे कृष्णा काळबांडे यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी सुरू आहे.

गिट्टीखदान
आरोपी विजय हटकरे (वय ५०, रा. कामठी) आणि ईस्माईल अन्सारी (रा. गव्हर्नमेंट प्रेस कॉलनी दाभा) या दोघांनी जुना फुटाळा येथील भीमसेन मंदिराजवळ राहणारे यादव धोंडीराम वानखेडे (वय ६६) यांना मौजा दाभा येथील आशादीप गृहनिर्माण सहकारी सोसायटीत १५०० चौरस फूटाचा भूखंड दाखवला.
तो १५ लाखांत विकण्याचा सौदा करून वानखेडे यांच्याकडून दोन्ही आरोपींनी १६ जून २०१६ रोजी १५ लाख रुपये घेतले.
बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याची वानखेडेला विक्रीही करून दिली. प्रत्यक्षात वानखेडे जेव्हा भूखंडाचा ताबा घेण्यासाठी गेले तेथे नमूद वर्णनाचा भूखंडच अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाल्यानंतर वानखेडे यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी हटकरे आणि अंसारीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांची चौकशी केली जात आहे.

 

Web Title: Cheating in plots selling in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.