कर्ज पुरवठादार कंपन्यांची बनवाबनवी उलटवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:29 IST2018-04-30T22:29:22+5:302018-04-30T22:29:33+5:30
ग्राहकाला नामोहरम करणाऱ्या दोन कर्ज पुरवठादार कंपन्यांची बनवाबनवी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने उलटवून लावली. त्यामुळे ग्राहकाला दिलासा मिळाला.

कर्ज पुरवठादार कंपन्यांची बनवाबनवी उलटवली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्राहकाला नामोहरम करणाऱ्या दोन कर्ज पुरवठादार कंपन्यांची बनवाबनवी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने उलटवून लावली. त्यामुळे ग्राहकाला दिलासा मिळाला.
फ्युचर मनी व कॅपिटल फर्स्ट अशी कंपन्यांची नावे आहेत. फ्युचर मनी कंपनीने अजनीतील ग्राहक प्रमोदकुमार साहू यांना मासिक १५ हजार ८०९ रुपये किस्तीप्रमाणे १४४ महिने कालावधीसाठी ११ लाख रुपयांचे कर्ज दिले होते. परंतु, त्यांना करारनाम्याची प्रत देण्यात आली नव्हती. असे असतानाही त्यांनी नियमानुसार कर्जाची परतफेड सुरू केली. दरम्यान, त्यांना कर्जाची रक्कम एकमुस्त भरायची होती. त्यामुळे त्यांनी फ्युचर मनीच्या शाखेत संपर्क साधला. त्यावेळी त्यांना फ्युचर मनीने कॅपिटल फर्स्टला शाखा हस्तांतरित केल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे त्यांनी कॅपिटल फर्स्टला कर्जाची रक्कम एकमुस्त स्वीकारून कर्ज खाते बंद करण्याची विनंती केली. परंतु, कॅपिटल फर्स्टने त्यांना अतिरिक्त रकमेची मागणी केली. साहू ७ लाख ४६ हजार ३८२.०२ रुपये देणे लागत असताना त्यांना ९ लाख ७२ हजार ३५८.२५ रुपयांची मागणी करण्यात आली. परिणामी साहू यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती.
असा आहे निर्णय
मंचचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी व सदस्य नितीन घरडे यांच्या न्यायपीठाने विविध बाबी लक्षात घेता साहू यांना दिलासा दिला. कंपन्यांनी साहू यांच्याकडून कर्जाची उर्वरित रक्कम एकमुस्त स्वीकारावी व त्यांना गहाणखत रद्द करून संपूर्ण मूळ दस्तावेज परत करावेत. तसेच, साहू यांना शारीरिक-मानसिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च म्हणून एकूण १० हजार रुपये देण्यात यावेत असे आदेश मंचने दिले.