चारित्र्यहनन करणे आत्महत्येस प्रोत्साहन
By Admin | Updated: February 23, 2015 02:35 IST2015-02-23T02:35:38+5:302015-02-23T02:35:38+5:30
एखाद्याचे सार्वजनिकरीत्या चारित्र्यहनन करणे म्हणजे आत्महत्येस प्रोत्साहन देणेच होय असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर निर्णय देताना नोंदविला आहे.

चारित्र्यहनन करणे आत्महत्येस प्रोत्साहन
राकेश घानोडे नागपूर
एखाद्याचे सार्वजनिकरीत्या चारित्र्यहनन करणे म्हणजे आत्महत्येस प्रोत्साहन देणेच होय असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर निर्णय देताना नोंदविला आहे. चारचौघांसमोर चारित्र्यहनन करणे ही संबंधित व्यक्तीच्या मनाला खिन्न व वैफल्यग्रस्त करणारी कृती आहे. चारित्र्यहननानंतर समाज आपल्याकडे वाईट नजरेने पाहील असा विचार करून ती व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकते, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
एका ग्रामीण अविवाहित मुलीवर सार्वजनिकरीत्या अनैतिक संबंधाचा आरोप करण्यात आला होता. यामुळे त्या मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी प्रकरणातील आरोपी दाम्पत्याचे शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळताना यासंदर्भात विस्तृत खुलासा केला आहे.
चारित्र्यावरील बेपर्वा, धक्कादायक व मानहानी करणारे आरोप कोणत्याही अविवाहित मुलीला निराशेच्या खाईत ढकलण्यास पुरेसे आहेत. आरोप सार्वजनिकरीत्या करण्यात आल्याने, आरोप करणारा पुरुष विवाहित असल्याने व आरोपांचे स्वरूप समाजातील प्रतिमा मलीन करणारे असल्यामुळे त्या मुलीची केवळ विवाहाची संभावनाच कमी झाली नव्हती तर, तिचे समाजात ताठ मानेने जगणेही कठीण झाले होते. गलिच्छ आरोपांनंतर समाज आपल्याकडे वाईट नजरेने पाहील असे एका ग्रामीण अविवाहित मुलीला वाटणे साहजिक आहे. परिणामी तिने निराश होऊन जीवन संपविण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नसल्याचा विचार केला असेल. यामुळे आरोपींची कृती आत्महत्येस प्रवृत्त करणारी आहे असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले आहे.
प्रोत्साहनाचा दुसरा प्रकार
भादंविच्या कलम १०७ अन्वये प्रोत्साहन म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यास प्रवृत्त करणे किंवा त्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यास जाणीवपूर्वक सहकार्य करणे किंवा एखाद्या कटांतर्गत दुसऱ्या व्यक्तीसोबत मिळून ती गोष्ट करण्यासाठी चिथावणी देणे होय. याप्रकरणात आरोपींनी मृताला विष प्राशन करण्यास सहकार्य केले नाही. तसेच, दोघांनी कट रचल्याचेही पुरावे नाहीत. परंतु, हे प्रकरण प्रोत्साहनाच्या दुसऱ्या प्रकारात मोडणारे असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
काय आहे प्रकरण
प्रेमिला बंडू डहाट (२७) व बंडू डहाट (३०) अशी आरोपींची नावे असून ते धापेवाडा, ता. कळमेश्वर येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव कविता (काल्पनिक नाव) होते. ती शेतात मजुरी करीत होती. कविताचे बंडूसोबत अनैतिक संबंध असल्याचा प्रेमिलाला संशय होता. ४ मार्च १९९४ रोजी दोन्ही आरोपी कविताच्या घरी गेले. दरम्यान, कविताने अनैतिक संबंधाचा आरोप फेटाळून लावला, तर बंडूने अनैतिक संबंध असल्याचे स्वीकार केले. त्याचवेळी कविताने आतल्या खोलीत जाऊन विष प्राशन केले. २० फेब्रुवारी २००१ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपींना भादंविच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे.