नागपुरातील पाचपावलीत गुंडांचा हैदोस , एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 20:44 IST2020-11-03T20:42:35+5:302020-11-03T20:44:18+5:30
Chaos of goons , Crime News, Nagpur जोरात दुचाकी चालवणाऱ्या गुंडाला हटकले म्हणून त्याने आपल्या २५ ते ३० साथीदारांच्या मदतीने पाचपावलीतील गोंडपुऱ्यात सोमवारी रात्री हैदोस घातला. एका तरुणावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

नागपुरातील पाचपावलीत गुंडांचा हैदोस , एक गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जोरात दुचाकी चालवणाऱ्या गुंडाला हटकले म्हणून त्याने आपल्या २५ ते ३० साथीदारांच्या मदतीने पाचपावलीतील गोंडपुऱ्यात सोमवारी रात्री हैदोस घातला. एका तरुणावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
पाचपावलीतील शीतलामाता मंदिराजवळ राहणाऱ्या रत्नमाला देवराव मसराम सोमवारी रात्री १० च्या सुमारास वस्तीतील लोकांसोबत चर्चा करत होत्या. आरोपी शुभम बारापात्रे हा जोरात दुचाकी चालवू लागला. त्यामुळे रत्नमाला मसराम यांनी त्याला हटकले. शुभमने यावेळी त्यांच्याशी वाद घातला. तो विचित्र वर्तन करत असल्यामुळे वस्तीतील मंडळी गोळा झाली. त्यामुळे त्यावेळी तो तिथून पळून गेला. काही वेळानंतर २५ ते ३० साथीदारांसह परतला. त्यांच्या हातात बास, बल्या, लाकडी दंडुके होते. आरोपी बारापात्रेने रत्नमाला यांचा मुलगा विशाल याच्यावर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. इतरांनाही मारण्याचा आरोपी प्रयत्न करू लागले. आरोपींनी परिसरातील वाहनांचीही तोडफोड केली. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पाचपावली पोलिस पोहोचले. तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. जखमी विशालला इस्पितळात दाखल करण्यात आले. रत्नमाला देवराव मसराम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शुभम बारापात्रे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.