'सरकारकडे राजकारण करण्यासाठी वेळ आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 13:07 IST2022-01-12T11:36:56+5:302022-01-12T13:07:16+5:30
तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, अद्याप सरकारकडून नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याचे आदेश काढण्यात आले नसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

'सरकारकडे राजकारण करण्यासाठी वेळ आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही'
नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले. याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनुकळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.
तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तुर, हरभरा, भाजीपाला पाण्यात गेला, संत्री, मोसंबी, कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र, अद्याप सरकारकडून पंचनाम्याचे कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. तीन दिवस झाले, न पालकमंत्री न जिल्हाधिकारी कोणीच दौरे केलेले नाहीत. या सरकारला राजकारण करायला वेळ आहे मात्र, शेतकऱ्यांकरता नाही, असा आरोप बावनकुळे यांनी केला.
..आता बांधही गेला आणि पंचनामेही गेले
मागच्या वेळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन नुकसानभरपाई देऊ असे म्हणाले होते. मात्र, आता बांधही गेला आणि पंचनामेही गेले. तुमच्यात थोडशीही संवेदनशीलताअसेल, तर तत्काळ सर्व पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करावा. व पंचनाम्याचे आदेश देऊन नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
विदर्भात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की नाही, आणि माहिती मिळाली असेल तर त्यांना विदर्भाबाबत काळजी आहे की नाही, याचाही तपास करावा असा खोटक टोलाही त्यांनी लगावला.