लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जीवघेण्या आजाराने मेंदूमृत (ब्रेनडेड) घोषित झालेल्या १० वर्षीय कैवल्य खाटीक या चिमुकल्याच्या अवयवदानाने चार गरजू रुग्णांना जीवनाची नवी उमेद मिळाली आहे. विशेष म्हणजे कैवल्यचे हृदय चेन्नई येथील सातवर्षीय चिमुकलीमध्ये धडधडणार आहे. नागपूरच्या 'झेडटीसीसी' विभागात बालकाच्या अवयवदानाची ही अनेक वर्षानंतरची पहिलीच घटना असल्याने, याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील साईनगर वडाळा (पैकू) येथील रहिवासी असलेला कैवल्य खाटीक हा एकुलता एक मुलगा होता. है कुटुंब नोकरीनिमित्त ठाण्यात वास्तव्यास होते. कैवल्यची प्रकृती अचानक विघडल्याने त्याला तातडीने ठाण्याच्या किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे नऊ दिवस उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला नागपूरच्या न्यू इरा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. येथे १० दिवस उपचार होऊनही त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. डॉक्टरांनी केलेल्या तपासण्यांनंतर, त्याच्या मेंदूमध्ये तीव्र रक्तस्राव झाल्याचे निदान झाले आणि अखेरीस त्याला मेंदूमृत घोषित करण्यात आले. न्यू इरा हॉस्पिटलच्या 'ब्रेन डेड' समितीमधील डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. पराग मून, डॉ. विवेक देशपांडे आणि डॉ. साहिल बनसल यांनी हे निदान केले. हॉस्पिटलचे समन्वयक डॉ. अश्विनी चौधरी यांनी कैवल्यच्या कुटुंबीयांना अवयवदानाबद्दल समुपदेशन केले. दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही कैवल्यच्या आईवडिलांनी अवयवदान करण्याची संमती दिली. त्यांनी हृदय, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडांचे दान करण्यास होकार दिला. ही माहिती विभागीय प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) देण्यात आली.
झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि सचिव डॉ. राहुल सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रत्यारोपण समन्वयक दिनेश मांडपे यांनी तातडीने पुढील प्रक्रिया सुरू केली. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रतीक्षा यादी तपासण्यात आली आणि अवयवांचे वाटप करण्यात आले.
ग्रीन कॉरिडॉर..कैवल्यचे हृदय चेन्नई येथील एमजीएम हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या एका सातवर्षीय मुलीला दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी न्यू इरा हॉस्पिटल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत 'ग्रीन कॉरिडॉर' करण्यात आला.विशेष विमानाने हृदय चेन्नईला गेले. यकृत न्यू इरा हॉस्पिटलमध्ये एका ३१ वर्षीय महिलेला, एक मूत्रपिंड नागपूरच्या एम्समधील १६ वर्षीय मुलाला, तर दुसरे मूत्रपिंड 'एम्स'मधीलच १७ वर्षीय मुलाला दान करण्यात आले. 'ग्रीन कॉरिडॉर'साठी वाहतूक पोलिस उपायुक्त ललित मतानी यांनी विशेष सहकार्य केले.