लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या शनिवार व रविवारी विदर्भाचे आकाश निरभ्र राहणार आहे. साेमवारी मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून १६ व १७ फेब्रुवारी राेजी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. काही ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतात असलेल्या पिकाबाबत सतर्कता बाळगण्याचा इशारा विभागाने दिला आहे.
हिंद महासागरात तयार झालेले सायक्लाेनिक सर्क्युलेशन पुढे वाढत बंगाल उपसागराच्या दक्षिण भागाकडे वाढत चालले आहे. त्यामुळे विदर्भ, कर्नाटक व मराठवाड्याच्या भागात समुद्र सपाटीपासून ०.९ किमीवर एक कुंड तयार हाेत आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला आकाशात ढग दाटण्याची व पुढे मंगळवार, बुधवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ही शक्यता लक्षात घेता शेतकरी बांधवांनी सतर्क राहण्याचा इशारा विभागाने दिला आहे. पाऊस होण्याची शक्यता असल्याने परिपक्व झालेल्या हरभरा, जवस, गहू, ज्वारी, मका, करडई, तूर आणि इतर पिकांची तत्काळ काढणी व मळणीची कामे करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापूस पिकाची वेचणी राहिली असल्यास लवकरात लवकर वेचणी करावी आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशिरा पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील पिकास आवश्यकता नसल्यास ओलीत करणे पुढे ढकलावे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेतात काम करीत असताना मेघगर्जनेचा आवाज आल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याची सूचना ग्रामीण कृषी मौसम सेवा, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिली आहे.
तापमानात वाढ
दरम्यान, दाेन दिवसांपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत दिवसाच्या तापमानात अंशत: वाढ नाेंदविण्यात आली आहे. नागपुरात दिवसाचे कमाल तापमान ३२.७ अंश नाेंदविण्यात आले जे १.४ अंश अधिक आहे. रात्रीच्या तापमानात १.३ अंशाच्या घटीसह १४.२ अंश नाेंद करण्यात आली. गाेंदिया वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत १ ते २ अंशाची वाढ झाली असून, येत्या तीन दिवसांत किमान व कमाल तापमानातही २ ते ३ अंशाची वाढ हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने नाेंदविला आहे.