उद्यापासून मध्य महाराष्ट्रात गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2023 18:31 IST2023-03-04T18:30:21+5:302023-03-04T18:31:27+5:30
Nagpur News नव्याने आलेल्या पश्चिमी झंझावातामुळे आणि गुजरात व आसपासच्या क्षेत्रात तयार झालेल्या सायक्लाेनिक सर्क्युलेशनमुळे विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात रविवार ५ ते ८ मार्चपर्यंत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उद्यापासून मध्य महाराष्ट्रात गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता
नागपूर : नव्याने आलेल्या पश्चिमी झंझावातामुळे आणि गुजरात व आसपासच्या क्षेत्रात तयार झालेल्या सायक्लाेनिक सर्क्युलेशनमुळे विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात रविवार ५ ते ८ मार्चपर्यंत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानंतरचे दाेन दिवसही ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सूर्याचा ताप वाढायला लागला आणि वातावरणातील थंडी जाऊन उष्णता वाढायला लागली. मार्चची सुरुवातही तापमानवाढीनेच झाली आहे. दिवसाचा पारा ३५ अंशांवर पाेहोचला आहे. त्यामुळे उन्हाचे चटके वाढले आहेत. रात्री वातावरणात गारवा असला तरी ताे केवळ बाहेरच जाणवताे. आतमध्ये उकाडा वाढायला लागला आहे. शनिवारी नागपूरला ३५.४ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली. अकाेला, बुलढाणा, ब्रह्मपुरीला सर्वाधिक ३८.२ अंश तापमान नाेंदविण्यात आले. गडचिराेली वगळता इतर सर्वच जिल्ह्यांत दिवसाचा पारा ३६ अंशांच्या वर पाेहोचला आहे.
अकाेल्यामध्ये रात्रीचा पाराही २३.५ अंशांच्या उच्चांकावर पाेहचला आहे, जाे सरासरीपेक्षा ५.१ अंशांनी अधिक आहे. बुलढाण्यात ताे २२.४ अंश आहे. चंद्रपूर व वर्ध्यात ते २०.६ व २०.५ अंश आहे. इतर जिल्ह्यांत ते २० अंशांच्या खाली असले तरी सरासरी १ ते २ अंशांपेक्षा अधिक आहे.
दरम्यान, उत्तरेकडील वातावरण बदलामुळे विदर्भात पावसाळी परिस्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे. शनिवारीच आकाशात ढगांचा लपंडाव सुरू हाेता. रविवारपासून त्यात आणखी वाढ हाेणार असून, तुरळक पाऊस व विजा चमकण्याची शक्यता आहे. तीन दिवस पावसाळी वातावरण कायम राहील. त्यानंतर दाेन दिवस ढगांची उपस्थिती राहील. या काळात कमाल व किमान तापमानात हलकी घसरण हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.