लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी येतात. दरम्यान दीक्षाभूमी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून मोबाईल टॉवर सुद्धा उभारण्यात आला आहे. याद्वारे गर्दीवर लक्ष ठेवले जाईल. संभाव्य गर्दीच्या नियंत्रणासाठी व सुरक्षेच्यादृष्टीने स्टॉलवर खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी सिलेंडर, इतर ज्वलनशील साहित्य ठेवता येणार नाही, अशी माहिती गुरूवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत देण्यात आली. दरम्यान दीक्षाभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सुविधा येत्या ३० सप्टेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रशासनाच्या विविध यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा विभागीय आयुक्त बिदरी यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, महानगपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, सदस्य विलास गजघाटे, सुधीर फुलझेले, डॉ. प्रदिप आगलावे प्रामुख्याने उपस्थित होते.
दीक्षाभूमी येथे धम्मचक्र दिनानिमित्त लाखो अनुयायी भेट देत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करतांना जिल्हा प्रशासनातर्फे येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही. तसेच या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासह, स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यासंदर्भात महानगरपालिकेसह विविध विभागांकडे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. संपूर्ण देशातून मागील वर्षीप्रमाणे १२ लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहतील यादृष्टीने व्यवस्था करतांना विविध यंत्रणांनी समन्वयाने संपूर्ण जबाबदारी पार पाडावी, अशी सूचना बिदरी यांनी यावेळी केली.
स्तुपामध्ये प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
मध्यवर्ती स्तुपातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश व तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्यासाठी मोठी रांग लागते. प्रत्येकाला स्तुपात जाऊन अभिवादन करता यावे, यासाठी स्तुपामध्ये प्रवेशासाठी एक आणि अभिवादन करून बाहेर जाण्यासाठी दुसरी अशी स्वतंत्र व्यवस्था राहील.
अन्नदान करण्यापूर्वी तपासणी आवश्यक
दीक्षाभूमीवरील भाविकांसाठी विविध संस्था व संघटनांकडून अन्नदानाची व्यवस्था करण्यात येते. अन्नदान करतांना गर्दी होणार नाही. तसेच गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने जागा निश्चित करून देण्यात येणार आहे. त्यासोबतच अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे स्वतंत्र पथकामार्फत अन्नदान करण्यापूर्वी तपासणी करूनच वितरण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
३५० पेक्षा अधिक पुस्तकांचे स्टाॅल
दीक्षाभूमीवर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे येथील पुस्तक विक्री होय. दरवर्षी कोट्यावधी रूपयांच्या पुस्तकांची विक्री दीक्षाभूमीवर केवळ दोन ते तीन दिवसात होत असते. पुस्तक विक्रीचा दरवर्षी रेकाॅर्ड होता. यंदाही ३५० पेक्षा जास्त पुस्तक विक्रीसाठी स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे.
अशी राहील व्यवस्था
- सुरक्षेसाठी ५६ सीसीटीव्ही कॅमेरांची निगरानी
- गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागतार्फे स्वतंत्र नियंत्रण कक्ष, मोबाईल टॉवर
- पिण्याच्या पाण्यासाठी १२० नळ
- भोजनदान करणाऱ्या संस्थांसाठी अतिरिक्त ७ टँकर
- माता कचेरी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदी परिसरात १ हजारावर तात्पुरती शौचालये
- पावसाच्या दृष्टीने परिसरातील शाळांमध्ये राहण्यासाठी अतिरिक्त सुविधा
- व्यवस्थेसंदर्भातील संपूर्ण माहिती सोशल मिडिया व डॅशबोर्डवर उपलब्ध राहणार
- रेल्वे स्टेशन व बसस्टॅण्ड तसेच ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी परिवहन विभागातर्फे ११० बसेसची व्यवस्था
- शहरातील अनुयायांसाठी ११ मार्गांवर ३० सप्टेंबरपासून आपली बस सुरू राहणार
- अग्निशमन यंत्रणा, वाहनतळ तसेच हरवलेल्या व्यक्तीसंदर्भातील माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्ष
Web Summary : Deekshabhoomi is set for Dhamma Chakra Pravartan Day with CCTV, mobile towers for crowd control. District administration ensures facilities like water, sanitation, and safety measures are in place for devotees. Separate entry, exit for stupa; food stalls to be checked. Book stalls aplenty.
Web Summary : दीक्षाभूमि धम्म चक्र प्रवर्तन दिवस के लिए सीसीटीवी, मोबाइल टावरों से भीड़ नियंत्रण किया जाएगा। जिला प्रशासन भक्तों के लिए पानी, स्वच्छता और सुरक्षा जैसे उपाय सुनिश्चित करता है। स्तूप के लिए अलग प्रवेश, निकास; खाद्य स्टालों की जाँच की जाएगी। पुस्तक स्टॉल भरपूर।