दीक्षाभूमीवर लागणार सीसीटीव्ही
By Admin | Updated: March 14, 2015 02:35 IST2015-03-14T02:35:08+5:302015-03-14T02:35:08+5:30
दलित बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीची सुरक्षा व्हावी, यासाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.

दीक्षाभूमीवर लागणार सीसीटीव्ही
नागपूर : दलित बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीची सुरक्षा व्हावी, यासाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. १६ मार्चला होत असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे.
जिल्हा नियोजन समितीने नाविन्यपूर्ण योजना म्हणून या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेचा मूळ प्रस्ताव हा ६२.१५ लाखांचा होता.
या प्रकल्पासाठी ५० लाख जिल्हा नियोजन समितीकडून मिळणार आहे. तितकाच निधी यावर खर्च केला जाणार आहे. त्यानंतर निधी प्राप्त झाला तरच उर्वरित काम पूर्ण केले जाणार असल्याची चर्चा आहे.
दीक्षाभूमीचा मुद्दा भावनिक असल्याने स्थायी समितीत हा प्रस्ताव एकमताने मंजूर होण्याची अपेक्षा असल्याने मे. टेक्नोकी सोल्युशन्स कॅमेरे लावण्याच्या तयारीत आहे. मनपाच्या गांधी कन्या शाळेच्या जागेवर क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. यावर २.५८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. प्रशासनाचाही या संकुलासाठी आग्रह आहे.
विवेकानंदनगर व गांधीसागर तलावाजवळ उभारण्यात आलेले क्रीडा संकूल याचेच एक प्रतीक आहे. या प्रकल्पावर सुरुवातीला १.७६ कोटींचा खर्च गृहीत धरण्यात आला होता. (प्रतिनिधी)
संविधान चौकाचे सौंदर्यीकरण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विचारात घेता संविधान चौकाच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी शुक्रवारी चौकाला भेट देऊ न कामाचा आढावा घेतला. या परिसरातील बंद पडलेला सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा, मूर्तीचा परिसर स्वच्छ करून रंगरंगोटीचे काम १४ एप्रिलपूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सुनील अग्रवाल, शरद बांते, उद्यान अधीक्षक नरेशचंद्र श्रीखंडे आदि उपस्थित होते.