सीबीएसई शाळा सोमवारपासूनच सुरू हाेणार, शिक्षण विभागाने संभ्रम पसरवू नये, विनाअनुदानित शाळा संघटनेची स्पष्ट भूमिका
By निशांत वानखेडे | Updated: October 26, 2025 23:20 IST2025-10-26T23:20:14+5:302025-10-26T23:20:29+5:30
CBSE School News: सुट्ट्यांबाबत सरकारने निर्धारित केलेल्या सर्व नियमांचे सीबीएसई शाळांकडून पालन केले जाते. अशावेळी एका संघटनेच्या दबावामुळे शिक्षण विभाग सर्व सीबीएसई शाळांना वेठीस धरू शकत नाही.

सीबीएसई शाळा सोमवारपासूनच सुरू हाेणार, शिक्षण विभागाने संभ्रम पसरवू नये, विनाअनुदानित शाळा संघटनेची स्पष्ट भूमिका
- निशांत वानखेडे
नागपूर - सुट्ट्यांबाबत सरकारने निर्धारित केलेल्या सर्व नियमांचे सीबीएसई शाळांकडून पालन केले जाते. अशावेळी एका संघटनेच्या दबावामुळे शिक्षण विभाग सर्व सीबीएसई शाळांना वेठीस धरू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सीबीएसई शाळा साेमवार २७ ऑक्टाेबरपासूनच सुरू हाेतील, अशी स्पष्ट भूमिका विनाअनुदानित शाळा कल्याण असाेसिएशनने घेतली आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिवाळीच्या सुट्ट्या १८ ते १ तारखेपर्यंत राहणार असल्याचे आदेश नुकतेच काढले असून याचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला हाेता. मात्र विनाअनुदानित सीबीएसई शाळांनी विपरित भूमिका घेतली आहे. असाेसिएशनचे उपाध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे यांनी, शिक्षण उपसंचालकांचा हा आदेश शाळा व पालकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा असल्याचे सांगितले. उपसंचालकांनी यापूर्वी १७ ऑक्टाेबरला दिवाळीच्या सुट्ट्या १८ ते २६ ऑक्टाेबरपर्यंत राहतील, असा आदेश काढला हाेता. आता ताे आदेश बदलून १ नाेव्हेंबरपर्यंत सुट्ट्या देण्याचा नवा आदेश काढल्याने संभ्रम निर्माण झाल्याची टीका टांकसाळे यांनी केली.
सरकारच्या नियमानुसार वर्षभरात ८७ सुट्ट्या शाळांनी मान्य केल्या आहेत. याशिवाय कधी अतिवृष्टीसारख्या आकस्मिक स्थितीत प्रशासनाकडून काढलेले सुट्ट्यांचे आदेश पाळले जातात. असे असताना अनावश्यक सुट्ट्यांसाठी दबाव टाकणे याेग्य नाही, अशी टीका संघटनेने केली आहे. सीबीएसईचा सिलॅबस हा व्यापक असताे. दिलेल्या काळात हा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही, तर विद्यार्थ्यांचे नुकसान हाेते. ही बाब आम्ही वारंवार शिक्षण विभागाला लक्षात आणून दिली आहे. मात्र तरीही एका संघटनेच्या दबावामुळे शिक्षण विभागाकडून अशाप्रकारे सीबीएसई शाळांना वेठीस धरले जात असल्याचा आराेप टांकसाळे यांनी केला. महाराष्ट्रात कुठेही इतक्या सुट्ट्यांचे आदेश नसताना नागपूरच्या शाळांवर का दबाव टाकला जाताे, असा सवाल त्यांनी केला. शिक्षण उपसंचालकांनी केवळ एका संघटनेचे म्हणणे न ऐकता शाळा संचालक व इतर शिक्षक संघटनांना विश्वासात घेऊन आदेश काढावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सीबीएसईच्या सर्व शाळा २७ ऑक्टाेबरपासूनच सुरू हाेतील, विभागाला जी कारवाई करायची आहे, ती करावी, असे आव्हान संघटनेतर्फे त्यांनी दिले.