...अन् नियंत्रण सुटून कार धडकली झाडावर, सीबीआय अधिकारी जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 18:37 IST2022-01-03T18:16:09+5:302022-01-03T18:37:04+5:30
भरधाव वेगात असलेली कार नियंत्रण सुटल्याने अचानक झाडावर जाऊन धडकली. या भीषण अपघातात सीबीआयचे पीएसआय हिमांशु उदयसिंह मीणा जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास सेमीनेरी हिल्स भागात घडला.

...अन् नियंत्रण सुटून कार धडकली झाडावर, सीबीआय अधिकारी जागीच ठार
नागपूर : सेमीनेरी हिल्स भागात पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान झालेल्या कार अपघातात सीबीआयचे पीएसआय जागीच ठार झाले. हिमांशु उदयसिंह मीणा (वय २७) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
मीणा पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास त्यांच्या कारने (एमएच ३१, एफआर ४७४१) घरून निघाले. पहाटेचा वेळ व रिकामे रस्ते असल्याने त्यांची कार वेगात होती. दरम्यान, अचानक त्यांचे नियंत्रण सुटून कार रवी फूड हाॅटेलच्या समोरील झाडाला धडकली. कारची धडक इतकी जबरदस्त होती की दूरपर्यंत मोठा आवाज गेला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सदर पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या मदतीने कार काढली. तसेच आत फसलेल्या मीणा यांना मेयोमध्ये दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यत पार्टी साजरी करून मीणा सकाळच्या वेळी सिगारेट पिण्यास रेल्वेस्थानकाकडे जात असताना हा अपघात झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता अपघातच असल्याचे स्पष्ट झाले.