सीबीआयचे सहसंचालक नागपुरात

By Admin | Updated: August 7, 2015 03:02 IST2015-08-07T03:02:14+5:302015-08-07T03:02:14+5:30

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) स्थानिक कार्यालयाला लागलेल्या आगीची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आली आहे.

CBI joint director Nagpur | सीबीआयचे सहसंचालक नागपुरात

सीबीआयचे सहसंचालक नागपुरात

आगीची दखल : वरिष्ठांशी केली चर्चा
नागपूर : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) स्थानिक कार्यालयाला लागलेल्या आगीची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, सीबीआयचे सहसंचालक (भोपाळ रिजन) राजीव शर्मा गुरुवारी नागपुरात पोहचले. त्यांनी स्थानिक वरिष्ठांकडून माहिती घेतल्यानंतर संबंधित विभागाच्या काही अधिकाऱ्यांशीही चर्चा केली.
सीजीओ कॉम्प्लेक्समधील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या सीबीआयच्या कार्यालयाला बुधवारी भल्या सकाळी भीषण आग लागली. या आगीत कार्यालयातील टीव्ही, एसी, कॉम्प्युटर आणि अन्य उपकरणांसह कार्यालयाचे संपूर्ण फर्निचर आणि महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले. सीबीआयने गेल्या दोन तीन वर्षांत मोठमोठ्या कारवाया केल्या असून, नागपूर विभागातील अनेक भ्रष्ट अधिकारी आणि काही खासगी मंडळींवरही गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे ही आग लागली की लावली गेली, असा प्रश्न चर्चेला आला आहे. दरम्यान, सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे तसेच पोलीस विभागातील वरिष्ठांसह गुन्हेशाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर या आगीमागची कारणे जाणून घेण्याचा बुधवार सकाळपासून कसोशीने प्रयत्न करीत आहेत. अधीक्षक तामगाडगे यांनी या घटनेची माहिती बुधवारी सकाळीच आपल्या वरिष्ठांना कळविली होती. त्यानुसार, भोपाळ रिजनचे सीबीआयचे सहसंचालक राजीव शर्मा गुरुवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. त्यांनी प्रारंभी तामगाडगे यांच्याकडून आगीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर केंद्रीय बांधकाम विभाग,अग्निशमन दलाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली. ही आग शॉर्ट सर्किटमुळेच लागल्याचे पोलिसांसकट विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत असून, घातपाताची शंका अनेक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे. मात्र, आम्ही सर्वच प्रकारच्या शक्यता पडताळून पाहात असल्याचे सीबीआयचे अधीक्षक तामगाडगे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: CBI joint director Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.