नागपुरात वेकोलिच्या अधिकाऱ्याकडे बेहिशेबी मालमत्ता, सीबीआयकडून गुन्हा दाखल, वेकोलीत खळबळ
By योगेश पांडे | Updated: December 22, 2025 22:32 IST2025-12-22T22:32:45+5:302025-12-22T22:32:52+5:30
Nagpur News: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या एका वरिष्ठ विक्री व्यवस्थापकाकडे मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती आढळली आहे. या प्रकरणात सीबीआयने संबंधित अधिकाऱ्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या निवासस्थानाहून लाखोंची रोकड व इतर वस्तू जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

नागपुरात वेकोलिच्या अधिकाऱ्याकडे बेहिशेबी मालमत्ता, सीबीआयकडून गुन्हा दाखल, वेकोलीत खळबळ
- योगेश पांडे
नागपूर - वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या एका वरिष्ठ विक्री व्यवस्थापकाकडे मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती आढळली आहे. या प्रकरणात सीबीआयने संबंधित अधिकाऱ्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या निवासस्थानाहून लाखोंची रोकड व इतर वस्तू जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
संदीप सिंग (केटीनगर) असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. सिंगने कामाची सुरुवात धनबादमधील बीसीसीएलमधून केली होती. ८ नोव्हेंबर २०२४ मध्ये सिंगची नागपुरात वेकोलिमध्ये बदली झाली. तेव्हापासून वरिष्ठ विक्री व्यवस्थापक म्हणून सिंग कार्यरत आहे. ऑगस्ट २०२३ ते ऑगस्ट २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीत सिंगने सार्वजनिक सेवक म्हणून पदावर असताना बेहिशेबी मालमत्ता जमविल्याची बाब निदर्शनास आली. सिंगने पत्नी श्वेता सिंगच्या नावाने स्थावर मालमत्तादेखील घेतली. उत्पन्नाच्या स्त्रोतांच्या तुलनेत सिंगकडे ४५.२३ लाखांची अधिक मालमत्ता आढळली. दोन वर्षांच्या कालावधीत सिंग पती-पत्नीची संभाव्य बचत ७९.९८ लाख होती.
मात्र त्या कालावधीत त्यांनी १.२५ कोटींची मालमत्ता संपादित केली. काही ठिकाणी पती-पत्नीच्या नावाने संयुक्त मालमत्ता आहेत. दोघांनाही त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे सीबीआयकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयचे उपअधीक्षक नीरज कुमार यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने सिंग दाम्पत्याकडून १७ लाख रुपये रोख आणि ९०० ग्रॅम सोने जप्त केले आहे. त्यांच्या नावावर पंजाबमधील मोहाली येथील एक बंगला, झारखंडमधील धनबादमधील तीन शेती जमीन, ८० लाख रुपयांचा भूखंड आणि आलिशान आतील सजावट असलेले घर देखील असल्याचे आढळले आहे. सिंग दाम्पत्याने अनेक बेहिशेबी गुंतवणूक केल्याचाही सीबीआयला संशय आहे.