मॉईलच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल; कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2023 11:10 PM2023-05-31T23:10:54+5:302023-05-31T23:12:28+5:30

Nagpur News मॉईलच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरोधात (वित्त) बेहिशेबी मालमत्ता साठविल्याच्या प्रकरणात सीबीआयतर्फे गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात आली आहे. सचिन गजल्लेवार असे संबंधित माजी मुख्य व्यवस्थापकाचे नाव आहे.

CBI files case against Moyle's former chief manager; Unaccounted assets worth crores | मॉईलच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल; कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता

मॉईलच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल; कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता

googlenewsNext


नागपूर : मॉईलच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरोधात (वित्त) बेहिशेबी मालमत्ता साठविल्याच्या प्रकरणात सीबीआयतर्फे गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात आली आहे. सचिन गजल्लेवार असे संबंधित माजी मुख्य व्यवस्थापकाचे नाव आहे. सीबीआयतर्फे आरोपीविरोधात गुन्हेगारी षडयंत्र, फसवणूक, गुन्हेगारी गैरवर्तणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे मॉईलच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.


गजल्लेवारकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता असून स्वत:च्याच बायकोच्या फर्मला नियमबाह्य पद्धतीने मॉईलच्या कामांचे कंत्राट दिले असल्याची तक्रार मॉईलकडे झाली होती. मॉईलने यासंदर्भात अंतर्गत चौकशी केली होती. या अंतर्गत चौकशीतून गजल्लेवारने गैरप्रकार केल्याचा अहवाल समोर आला होता. याच्या आधारावर मॉईलचे मुख्य व्हिजिलन्स अधिकारी प्रदीप कामले यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपमहानिरीक्षक एम.एस.खान यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे सीबीआयने चौकशी केली असता अहवालातील बाबी खऱ्या असल्याची बाब समोर आली.

गजल्लेवारने आपल्या पदाचा दुरुपयोग करत स्वत:च्याच बायकोच्या फर्मला कामे दिली. तसेच विविध वस्तूंच्या खरेदीप्रक्रियेदरम्यान मॉईलच्या अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या आणि गुन्हेगारी षडयंत्र रचल्याची बाब स्पष्ट झाली. सीबीआयने गजल्लेवारसह पत्नीच्या बॅंक खात्यांची पडताळणी केली असता त्यातून मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण झाल्याचे निदर्शनास आले. गजल्लेवारने मॉईलची १.३५ कोटींनी फसवणूक केली तसेच बेहिशेबी मालमत्ता जमा केली.

यासंदर्भात विस्तृत चौकशीनंतर गजल्लेवारविरोधात सीबीआयच्या नागपूर कार्यालयाने त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात गुन्हेगारी कट, मालमत्तेचा गैरवापर, फसवणूक, खोटेपणा बनावट दस्तऐवजांचा वापर आणि गुन्हेगारी गैरवर्तन इत्यादी कलमे लावण्यात आली आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर गजल्लेवारच्या निवासस्थानी व त्याच्या इतर दोन फ्लॅट्समध्ये तपासणी केली. तसेच त्याचीदेखील चौकशी केली, असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस निरीक्षक विजय कुमार सिंह हे या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.

Web Title: CBI files case against Moyle's former chief manager; Unaccounted assets worth crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.