ठकबाज भावंडांना सीबीआयने नागपुरातून केली अटक, १५ वर्षांपासून होते फरार
By योगेश पांडे | Updated: September 15, 2025 23:58 IST2025-09-15T23:57:42+5:302025-09-15T23:58:37+5:30
विशेष न्यायालयाने ठरविले होते फरार : कोलकातामध्ये दोन बॅंकांची केली होती फसवणूक

ठकबाज भावंडांना सीबीआयने नागपुरातून केली अटक, १५ वर्षांपासून होते फरार
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : कोलकातातील दोन बॅंकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात सीबीआयने तीन ठकबाज भावंडांना नागपुरातून अटक केली आहे. तीनही भाऊ मागील १५ वर्षांपासून फरार होते व त्यातील दोघांवर सीबीआयने प्रत्येकी एक लाखाचे रोख बक्षीस जाहीर केले होते. त्यांच्या चौथ्या भावाला छत्रपती संभाजीनगरातून अटक झाली.
राजकुमार चुरेवाल (६१), माधव चुरेवाल आणि दीपक चुरेवाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा चौथा भाऊ राजेश चुरेवाल (५९) याला छत्रपती संभाजीनगरातून अटक करण्यात आली. सीबीआयच्या कोलकाता युनिटने २००४ मधील बँक फसवणूक प्रकरणांच्या संदर्भात राजकुमार चुरेवाल आणि माधव चुरेवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तर २००७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात इतर दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २०१० मध्ये फरार घोषित केले होते.
राजकुमार व राजेशवर प्रत्येकी एक लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यांचा देशपातळीवर शोध सुरू होता. आरोपींनी आणखी एका बॅंकेकडून कर्ज घेतले होते. फरार झाल्यावर आरोपींनी बनावट नावांनी बनावट सरकारी ओळखपत्रे मिळवून त्यांची खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांची खोटी नावे व निवासी पत्त्यांबद्दल सीबीआयला माहिती मिळाली होती. सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कोलकाताच्या पथकांनी रविवारी नागपुरात येऊन शोधमोहीम सुरू केली. राजकुमार चुरेवाल, माधव चुरेवाल आणि दीपक चुरेवाल यांना नागपूरमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून आणि राजेश चुरेवाल यांना छत्रपती संभाजी नगर येथून अटक करण्यात आली.
आरोपींना कोलकाता येथील सक्षम न्यायालयात हजर केले जाईल. सीबीआयकडून त्यांच्याविरुद्ध राज्य पोलिसांकडे तोतयागिरी करून फसवणूक करणे, फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार करणे आणि इतर संबंधित गुन्ह्यांसाठी नवीन गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासंदर्भात सीबीआयचे अधीक्षक ऋषिकेश सोनावणे यांना संपर्क केला असता या प्रकरणाचे सर्व तपशील कोलकाता युनिटकडे असून त्या पथकानेच ही कारवाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.