वर्धा जिल्ह्यात जाणारी विदेशी दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:08 IST2021-04-19T04:08:03+5:302021-04-19T04:08:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : ग्रामीण भागात दारूच्या अवैध विक्रीत वाढ हाेत असताना दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात विक्रीसाठी नेली ...

वर्धा जिल्ह्यात जाणारी विदेशी दारू पकडली
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : ग्रामीण भागात दारूच्या अवैध विक्रीत वाढ हाेत असताना दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात विक्रीसाठी नेली जात असलेली विदेशी दारू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. ही कारवाई बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ढवळेपेठ शिवारात शनिवारी (दि. १७) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. यात कारचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारी कार व दारू असा एकूण ५ लाख ८४ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
अक्षय ऊर्फ अरविंद मधुकर लभाने (२७, रा. वाघाेडा, ता. समूद्रपूर, जिल्हा वर्धा) असे अटक करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव असून, कारमालक अनिकेत कांबळे, रा. उबदा, ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा हा पळून गेल्याची माहितीही पाेलिसांनी दिली. लाॅकडाऊन काळात दारूची अवैध विक्री वाढल्याने स्थानिक गुन्हे शाखेने या अवैध दारूविक्रेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुटीबाेरी परिसरात गस्तीवर असताना वर्धा जिल्ह्याच्या दिशेने दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी नागपूर-वर्धा मार्गावरील ढवळेपेठ शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली.
यात पाेलिसांनी नागपूरहून वर्धेकडे जाणारी एमएच-०४/एचएन-४२२२ क्रमांकाची कार थांबवून झडती घेतली. त्या कारमध्ये त्यांना विदेशी दारूच्या ३० पेट्या आढळून आल्या. त्यामुळे पाेलिसांनी कारचालक अक्षय लभाने यास अटक केली, तर या धावपळीत अंधाराचा फायदा घेत अनिकेत कांबळे पळून गेल्याने त्याचा शाेध सुरू केला. या कारवाईमध्ये चार लाख रुपयांची कार तसेच १ लाख ८४ हजार ४४० रुपये किमतीची दारू असा एकूण ५ लाख ८४ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. यात विदेशी दारूच्या २५ तर बीअरच्या पाच पेट्या असल्याचे पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे गजेंद्र चाैधरी, रामराव आडे, कुणाल येलेकर, अमृत किंनगे यांच्या पथकाने केली.