मांजाने घेतला विद्यार्थ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:20 IST2021-01-13T04:20:19+5:302021-01-13T04:20:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - प्रणय प्रकाश ठाकरे (वय २१) हा युवक त्याच्या वडिलांसह बहिणीच्या ॲडमिशनसाठी गेला होता. तिकडचे ...

The cat killed the student | मांजाने घेतला विद्यार्थ्याचा बळी

मांजाने घेतला विद्यार्थ्याचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - प्रणय प्रकाश ठाकरे (वय २१) हा युवक त्याच्या वडिलांसह बहिणीच्या ॲडमिशनसाठी गेला होता. तिकडचे काम आटोपल्यानंतर प्रकाश ठाकरे यांनी प्रणयला तू पुढे चल, मी येतो मागून म्हणून घराकडे पाठविले. काही वेळेनंतर प्रकाश ठाकरे जाटतरोडी पोलीस चौकीजवळून जात असताना त्यांना तेथे गर्दी दिसली. प्रकाश तेथून घरी गेले. घरी गेल्यानंतर प्रणय अद्याप घरी पोहचलाच नाही, हे त्यांना कळले अन् काही वेळेतच पोलिसांनी त्यांच्या काळजाला चिरणारी बातमी सांगितली. मांजाने गळा कापल्याने प्रणयचा मृत्यू झाल्याचे कळाल्याने ते सुन्नच पडले. नायलॉन मांजा विक्री आणि वापरावर शासनाने बंदी घातली आहे. घातक मांजा विकू नका, साठवू नका आणि वापरूही नका, असे आवाहन करून पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. अनेक मांजा विक्रेत्यांवर कारवाईदेखिल केली जात आहे. मात्र, पैशासाठी दुसऱ्याच्या जीवावर उठलेले समाजकंटक मांजाची विक्री करत आहेत अन् वापरतही आहेत. त्यांच्यामुळेच मंगळवारी सायंकाळी ५.१५ ते ५.३० च्या सुमारास इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली अन् कोणताही दोष नसताना प्रणय प्रकाश ठाकरे या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला.

अजनीतील ज्ञानेश्वरीनगरात राहणारा प्रणय पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता. तो त्याचे वडील, बहीण श्रुती आणि मोठे वडील रमेश ठाकरे हे चाैघे मंगळवारी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात डोमिसाईल बनविण्यासाठी गेले होते. तेथून ते दाभ्याच्या एका नर्सिंग कॉलेजमध्ये गेले. तेथे श्रुतीच्या ॲडमिशनची प्रक्रिया आटोपल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास प्रकाश ठाकरे यांनी प्रणय तसेच मोठे भाऊ रमेश यांना घराकडे जायला सांगितले. त्यानुसार, रमेश ठाकरे त्यांच्या मोटरसायकलने तर प्रणय ॲक्टीव्हाने निघाले. संविधान चौकाजवळून रमेश ठाकरे रेल्वेस्थानकाकडे निघाले तर प्रणय त्याच्या ॲक्टीव्हाने घराकडे निघाला. सरदार पटेल चौकातून जाटतरोडी मार्गे तो घरी जात होता. पोलीस चाैकीजवळ अचानक त्याला गळा कापला जात असल्याचे लक्षात आले. त्याने जीव वाचविण्यासाठी दोन्ही हाताने मांजा पकडला. त्यात दुचाकी सुटून तो खाली पडला. गळा खोलवर कापला गेला अन् हातही कापले गेले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने प्रणय गंभीर अवस्थेत रस्त्यावर आचके देऊ लागला. आजूबाजूच्यांनी धाव घेऊन प्रणयला तातडीने पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात पाठविले. माहिती कळताच ठाणेदार मुकुंद सोळंके आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे पोहचले. मेडिकलमध्ये डॉक्टरांनी प्रणयला मृत घोषित केले.

---

बहिणीला मोबाईल दिला अन्...

प्रणयने घराकडे निघताना त्याच्याजवळचा मोबाईल बहिणीला दिला होता. त्यामुळे त्याचा अपघात झाल्यानंतर त्याच्या घरच्यांना संपर्क करणेही शक्य झाले नाही. दुचाकीच्या कागदपत्रावरून त्याच्या घराचा पत्ता शोधत पोलीस घरी पोहचले. त्यावेळी श्रुतीची नर्सिंगला ॲडमिशन झाल्याच्या आनंदात त्याचे कुटुंबीय होते. काही वेळेपूर्वीच प्रकाश ठाकरे ज्या ठिकाणी प्रणयचा घात झाला तेथून परतले होते. गर्दीतून त्यांनी कोण पडून आहे, हे जाणून घेण्याऐवजी घर गाठले अन् नंतर पोलिसांनी त्यांना जी माहिती दिली ती त्यांचे काळीज चिरणारी ठरली.

----

पतंगबाजाविरुद्ध कुटुंबीयांचा आक्रोश

प्रणयचे वडील प्रकाश ठाकरे इलेक्ट्रीशियन आहेत. त्याच्या आईचे लहानपणीच निधन झाले. त्याला श्रुती नामक लहान बहीण आहे. तर, प्रकाश यांना रमेश, पोलीस हवालदार अनिल ठाकरे तसेच एक डॉक्टर असे तीन चुलत भाऊ आहेत. ते सर्व एकाच इमारतीत राहतात. प्रणयच्या अशा अकाली मृत्यूने ठाकरे कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. मांजा विक्रेते अन् पतंगबाजांविरुद्धही त्यांनी एकच आक्रोश केला आहे. अशा प्रकारे निर्दोष व्यक्तींचे बळी घेणारे मांजा विक्रेते तसेच पतंगबाजावर हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रणयचे मोठे वडील रमेश ठाकरे यांनी लोकमतजवळ नोंदवली.

---

-मेंंदुला रक्तपुरवठा करणारी धमनीच कापते

गळा चिरल्यास श्वासनलिका, गळ्यातून मेंदुकडे रक्तपुरवठा करणारी ‘कॅरोटीड्’ धमणी व मेंदुकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे नेणारी ‘जुगलर’ रक्तवाहिनी फाटून मृत्यूचा धोका असतो. गळ्याच्या वरच्या भागात श्वासनलिका असते. तर, ‘जुगलर’ रक्तवाहिनी ही खूप पातळ असते. यामुळे गळ्याला धारधार वस्तू लागल्यास ती कापण्याची भिती असते. म्हणूनच नायलॉन मांजावर बंदी आणली आहे. हा मांजा जीवघेणा ठरत आहे.

-डॉ. अशोक नितनवरे

प्रमुख, कान, नाक व घसा विभाग, मेडिकल

Web Title: The cat killed the student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.