कार, मोटारसायकलमध्येही लागेल आता विमानासारखा 'ब्लॅकबॉक्स'
By निशांत वानखेडे | Updated: February 28, 2026 15:37 IST2026-02-28T15:36:28+5:302026-02-28T15:37:33+5:30
Nagpur : जगभरात कुठेही विमानाचा अपघात झाला की सर्वात आधी शोधला जातो त्यातील 'ब्लॅकबॉक्स'. या ब्लॅकबॉक्समुळेच विमानाच्या अपघाताची अचूक कारणे समोर येतात.

Cars and motorcycles will now also have 'black boxes' like airplanes
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरात कुठेही विमानाचा अपघात झाला की सर्वात आधी शोधला जातो त्यातील 'ब्लॅकबॉक्स'. या ब्लॅकबॉक्समुळेच विमानाच्या अपघाताची अचूक कारणे समोर येतात. असाच ब्लॅकबॉक्स लवकरच कार आणि मोटारसायकलमध्ये लागलेला दिसेल.
नागपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केले असून भविष्यात लहान-मोठ्या अपघाताची कारणे शोधण्यासाठी आणि अलर्ट मिळाल्यावर मदत पोहोचविण्यासाठी क्रांतिकारी ठरणार आहे. एस.बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चचे सहायक प्राध्यापक डॉ. राहुल पेठे आणि हर्ष सूर्यवंशी, रोहित शहारे, वृषभ गिल्लरकर व आर्य पाठेकर यांनी हे संशोधन केले आहे. 'स्मार्ट सिस्टीम फॉर डिटेक्टिंग व्हेईकल्स सिग्नल्स अॅण्ड अॅक्सिडंट्स' असे या प्रकल्पाचे नाव आहे.
व्यक्तीच्या परवानगीशिवाय निघणार नाही एटीएमचे पैसे
डॉ. पेठे यांच्या टीमने 'फेस गार्ड एटीएम सिक्युरिटी सिस्टीम' सुद्धा विकसित केली आहे. रोहित शहारे या विद्यार्थ्याचे यात महत्त्वाचे योगदान आहे. यामध्ये एटीएम व्यक्तीच्या चेहऱ्याची ओळख पटवेल. संबंधित व्यक्ती घरातील ठराविक लोकांना त्यांचा एटीएम वापरण्याची परवानगी देईल. परंतु त्याची माहिती व्यक्तीच्या व्हॉट्सअॅपवर येईल. कुणी एटीएमची चोरी केली, पासवर्डही माहिती केला, तरी चेहऱ्याची ओळख पटल्याशिवाय तो पैसे काढू शकणार नाही. कुणी प्रयत्न केला, तर ताबडतोब त्याचा संदेश कार्डधारकाच्या मोबाइलवर जाईल. त्यांच्या परवानगीचा संदेश सिस्टीमला गेल्यावरच एटीएममधून पैसा काढता येईल. मुलाने एटीएम वापरला तरी त्याला पैसे काढू द्यायचे की नाही आणि होणारी चोरी वेळेवरच टाळता येईल, असा दावा डॉ. पेठे यांनी केला आहे.
हा ड्रोन स्वतःच करेल फवारणी
या टीमने स्वयंचलित ड्रोन सिस्टीम तयार केली आहे. यामध्ये ड्रोन शेतीच्या कामापासून आपत्काळात स्वतःच मदत पोहोचविण्याचे काम करेल. केवळ सिस्टीममध्ये त्याला ठराविक टास्क द्यावा लागेल. शेतात फवारणी करायची असेल, तर सिस्टीममध्ये किती एकरात फवारणी करायची, ही माहिती फिट करावी लागेल. त्यानंतर त्यात कीटकनाशक टाकले की ड्रोन स्वतःच फवारणीचे काम पूर्ण करून परत त्याच जागेवर येईल. याशिवाय ऑटोमॅटिक सोलर पॅनल क्लिनिंग सिस्टीमही या टीमने विकसित केले आहे, जे मोबाइलद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यातून कुठूनही वापरता येईल.