लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवरील जयप्रकाश मेट्रो स्टेशनजवळील डबलडेकर फ्लायओव्हरवर बुधवारी सायंकाळी धावत्या कारला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. काही मिनिटांतच कार पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, चालक उडी मारून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वीफ्ट डिझायर (एमएच २९ ०२८८) ही कार चालवणारे अमजद खान इब्राहिम खान (वय ३२, रा. बसंतनगर, पुसद) हे यशोधरानगर येथील रुग्णालयात नातेवाइकाला भेटून परत पुसदकडे जात होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास फ्लायओव्हरवर पोहोचताच कारच्या बोनटमधून धूर निघताना दिसला. परिस्थिती ओळखून त्यांनी तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी कारचे दरवाजे लॉक झाले. कसाबसा बाहेर पडताच काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली.
या घटनेमुळे फ्लायओव्हरवर वाहनांची मोठी रांग लागून वाहतूक विस्कळीत झाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बेसा-पिपळा व नरेंद्रनगर केंद्रातून दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कारचे मोठे नुकसान झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, ही डिझेल इंजिनची कार असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मदतीऐवजी व्हिडिओ काढण्यात धन्यता
बेसा-पिपळा नगरपंचायतीच्या जलपुरवठा अभियंता पूजा जाधव या घरी जात असताना अजनी ते एअरपोर्टदरम्यान फ्लायओव्हरवर कारला आग लागलेली दिसली. त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला कळविले. तसेच अग्निशमन अधिकारी संकेत प्रमोद माटे यांनाही माहिती दिल्यानंतर तातडीने अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना केले. मात्र, काही जण मदत करण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात धन्यता मानत होते.
Web Summary : A speeding car caught fire on a Nagpur flyover. The driver jumped out just in time, escaping unharmed as the car was completely destroyed. Firefighters quickly extinguished the blaze, which caused a traffic jam. Short circuit suspected as the cause.
Web Summary : नागपुर में एक फ़्लाईओवर पर चलती कार में अचानक आग लग गई। ड्राइवर ने समय रहते कूदकर अपनी जान बचाई, जबकि कार पूरी तरह जल गई। आग लगने से यातायात बाधित हो गया। शॉर्ट सर्किट से आग लगने की आशंका है।