जुन्या वादातून कॅबचालकाची चाकूने भोसकून हत्या
By योगेश पांडे | Updated: May 17, 2024 16:58 IST2024-05-17T16:58:16+5:302024-05-17T16:58:48+5:30
Nagpur : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली ही घटना

Cab driver stabbed to death over old dispute
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुन्या वादातून एका तरुण कॅबचालकाची दोन आरोपींनी मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने भोसकून हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
यश विष्णू गोनेकर (२१, म्हाडा क्वॉर्टर, कपिलनगर) असे मृतकाचे नाव आहे. तर शेख अरबाज शेख ईकबाल (म्हाडा कॉलनी) व असलम उर्फ गुड्डू मकसूद अन्सारी (म्हाडा कॉलनी) हे आरोपी आहेत. काही दिवसांअगोदर यश व अरबाजचे भांडण झाले होते. त्यानंतर अरबाजने घरी जाऊन यशची माफी मागितली होती. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास यश ओलाची ट्रीप आली म्हणून घराबाहेर निघाला. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास फरदीन सेलिब्रेशन हॉलजवळ आरोपींनी त्याला अडवले व त्याच्या मांडीवर तसेच पार्श्वभागात चाकू भोसकला. यात यश गंभीर जखमी झाला. त्याला अगोदर मेयो इस्पितळात नेण्यात आले. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्याच्या कुटुंबियांनी विचारणा केली असता त्याने आरोपींची नावे सांगितली. त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. त्याचे वडील विष्णू यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.