ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद, विद्यार्थ्यांनी शाळेत जावे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:13 AM2021-08-12T04:13:04+5:302021-08-12T04:13:04+5:30

ब्रिजेश तिवारी काटोल : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना काटोल-नरखेड तालुक्यातील वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. ...

Bus services in rural areas closed, how can students go to school? | ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद, विद्यार्थ्यांनी शाळेत जावे तरी कसे?

ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद, विद्यार्थ्यांनी शाळेत जावे तरी कसे?

Next

ब्रिजेश तिवारी

काटोल : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना काटोल-नरखेड तालुक्यातील वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, काटोल एसटी आगारातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शाळेत जावे तरी कसे, असा बिकट प्रश्न आहे. डिझेलअभावी अनेक बसफेऱ्या रद्द होत असल्याने अवैध प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशी एसटीपासून दूर जात आहेत.

काटोल एसटी आगारातर्फे काटोल-नरखेड तालुक्यात दररोज ८७ शेड्यूल आहे; पण कोरोनाच्या संकटानंतर केवळ ४२ शेड्यूल सुरू आहेत. काटोल-नरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत, तसेच एसटीच्या नागपूर विभागात गेल्या तीन महिन्यांपासून डिझेल संकट सुरू आहे. काटोल आगारात गत तीन महिन्यांपासून डिझेल येत नसल्याने गाड्यांना डिझेल भरण्यासाठी नागपूरला जावे लागते. म्हणजे काटोल-कोंढाळी फेरीकरिता काटोलवरून बस नागपूरला जाते. डिझेल मिळाले तर परत काटोलला येते, नंतर ती कोंढाळीला जाते. डिझेलअभावी दररोज काटोल आगाराच्या जवळपास २५ बसफेऱ्या रद्द होत आहेत. एक तर बसफेऱ्या कमी. त्यातही डिझेलअभावी बसफेरी रद्द होत असल्याने काटोल, नरखेड, सावनेर आदी मार्गांवर तासन्‌तास बस उपलब्ध नसल्याने अवैध प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन मिळाले आहे. असेच चित्र जिल्ह्यातील इतर आगाराचे आहे. नागपूर विभागांतर्गत काटोल, रामटेक, उमरेड, सावनेर व नागपूर शहरातील घाट रोड, गणेशपेठ, इमामवाडा, वर्धमाननगर, असे एकूण आठ आगार मोडतात; पण सर्व एसटी आगारांना केवळ गणेशपेठ व घाटरोड आगारातूनच डिझेल मिळत आहे.

काटोल- नरखेड तालुक्यातील वर्ग ८ ते १२ पर्यंत शाळा सुरू झाल्या असल्या तरी काटोल आगारातर्फे ग्रामीण भागातील बसफेऱ्या डिझेलअभावी अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत.

-सुधीर पवार, वाहतूक निरीक्षक, काटोल आगार

एसटी पासचा उपयोग काय?

काटोल एसटी आगारांतर्गत काटोल, कोंढाळी, नरखेड, सावरगाव व मोवाड ही पाच बसस्थानके येतात. या पाचही बसस्थानकांवरून जवळपास ३ हजार विद्यार्थ्यांना एसटी सवलत पास व मुलींना अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत मोफत पास देण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणाकरिता काटोल, कोंढाळी, जलालखेडा, नरखेड, मोवाड येथे येतात; पण ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद असल्याने या विद्यार्थ्यांनी शिक्षणाकरिता यावे तरी कसे, असा बिकट प्रश्न आहे.

काटोलनजीकच्या कचारी सावंगा येथील विमल मोरे या काटोलच्या लता मंगेशकर ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपचाराला आल्या होत्या. काटोल बसस्थानकावर दुपारी १ वाजता आल्या; पण डिझेलअभावी एसटी बस नसल्याने चार तासांपासून बसस्थानकावरच ताटकळत थांबल्या आहेत. विमल मोरे एकट्याच नव्हेत, तर कचारी सावंगा येथील 20 ते 25 प्रवासी असूनही डिझेलअभावी बससेवा नाही.

फोटो....विमल मोरे कचारी सावंगा

Web Title: Bus services in rural areas closed, how can students go to school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.