नागपुरात निवृत्त अधिका-याकडे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:00 IST2019-07-04T23:59:52+5:302019-07-05T00:00:45+5:30
सोनेगावमधील मनीष ले-आऊटमध्ये राहणा-या एका निवृत्त अधिका-याच्या घराच्या दाराचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी रोख आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. बुधवारी रात्री ही घरफोडीचाी घटना उघडकीस आली.

नागपुरात निवृत्त अधिका-याकडे घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोनेगावमधील मनीष ले-आऊटमध्ये राहणा-या एका निवृत्त अधिका-याच्या घराच्या दाराचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी रोख आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. बुधवारी रात्री ही घरफोडीचाी घटना उघडकीस आली.
सुशीलकुमार सिद्धेश्वर ठाकूर (वय ६५) हे एका सिमेंट कंपनीत मुंबईला उच्चपदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते नागपुरात स्थायिक झाले. त्यांचे सोनेगावच्या मनीष ले-आऊटमधील नागपूर गृह निर्माण सोसायटीत निवासस्थान आहे. २६ जूनला ठाकूर दाम्पत्य त्यांच्या दाराला कुलूप लावून बिहारमध्ये गेले होते. बुधवारी रात्री ते परत आले. त्यांनी आपल्या वाहनचालकाला घरून कार घेऊन रेल्वेस्थानकावर येण्यास सांगितले. चालक ठाकूर यांच्या घरी कार घ्यायला गेला असता त्याला मुख्य प्रवेशद्वाराचे कडीकुलूप तुटून दिसले. चालकाने कार रेल्वेस्थानकावर नेल्यानंतर ठाकूर यांना कारमध्ये बसविले आणि रस्त्यात घराच्या दाराचे कुलूप तुटून दिसल्याची माहिती सांगून घरात चोरी झाली असावी, असा संशय व्यक्त केला. परिणामी ठाकूर यांनी कारचालकाला सरळ सोनेगाव ठाण्यात चलण्यास सांगितले. ठाकूर यांनी माहिती दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक उल्लेवार आपल्या सहकाऱ्यांसह ठाकूर यांच्या घरी पोहचले. चोरट्यांनी घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त करून ४५ हजारांची रोकड, सोन्याचांदीचे दागिने आणि अन्य चिजवस्तूंसह ३ लाख, ५५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले.
चोरट्यांनी आपली ओळख लपविण्यासाठी घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. ठाणेदार मनोहर कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली सोनेगाव पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.