अट्टल घरफोड्यांना अटक, तीन गुन्हे उघडकीस
By योगेश पांडे | Updated: July 18, 2024 16:02 IST2024-07-18T16:01:33+5:302024-07-18T16:02:08+5:30
Nagpur : दोन दुचाकींसह १.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Burglars arrested, three crimes revealed
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
१२ मे ते १४ मे दरम्यान दर्शन कॉलनीतील रहिवासी प्रमोद रामशिरोमणी मिश्रा हे घराला कुलूप लावून मध्यप्रदेशला गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडून ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. नंदनवन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाकडून याचा समांतर तपास सुरू होता. खबऱ्यांचे नेटवर्क व तांत्रिक तपासातून पोलिसांनी नंदनवन झोपडपट्टीतील गल्ली क्रमांक १४ मधील चेतन मनोज घुरडे (२३), शुभम श्रीधर डुंबरे (३०), बबलू लालमनी पांडे (४५) तसेच अक्षय दिनेशकुमार गुप्ता (२५, चनकापूर, खापरखेडा) यांना ताब्यात घेतले. आरोपींना विचारणा केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सखोल चौकशीदरम्यान त्यांनी स्वतंत्रनगर व आराधनानगर येथेदेखील घरफोडी केल्याची माहिती दिली. आरोपींकडून गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेल्या दोन दुचाकींसह १.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.