देशविरोधी वातावरण तयार करणाऱ्यांविरुद्ध जनआंदोलन उभारा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 13:17 IST2023-08-05T13:15:56+5:302023-08-05T13:17:18+5:30
उपराष्ट्रपती म्हणाले, ‘लोकसभा व राज्यसभा ही लोकशाहीची मंदिरे आहेत; परंतु, लोकशाहीलाच तिलांजली देण्याचे काम सुरू आहे. देशभरातील लोकप्रतिनिधी हे संसदेत निवडून येतात. त्यामुळे येथे लोकांच्या विषयावर चर्चा, संवाद होणे अपेक्षित आहेत; परंतु, तेच होताना दिसून येत नाही.’

देशविरोधी वातावरण तयार करणाऱ्यांविरुद्ध जनआंदोलन उभारा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड
नागपूर : ‘२०४७ पर्यंत भारत जगातील पहिली मोठी अर्थव्यवस्था असणारा देश व्हावा, या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, जगात काही लोक हे जाणीवपूर्वक भारतविराेधी वातावरण (ॲन्टी इंडिया नॅरेटिव्ह) तयार करीत आहेत. तेव्हा नागरिकांनी अशा लोकांविरुद्ध जनआंदोलन उभारावे,’ असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस होते. उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष अतिथी होते. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे व्यासपीठावर उपस्थित होते.
उपराष्ट्रपती म्हणाले, ‘लोकसभा व राज्यसभा ही लोकशाहीची मंदिरे आहेत; परंतु, लोकशाहीलाच तिलांजली देण्याचे काम सुरू आहे. देशभरातील लोकप्रतिनिधी हे संसदेत निवडून येतात. त्यामुळे येथे लोकांच्या विषयावर चर्चा, संवाद होणे अपेक्षित आहेत; परंतु, तेच होताना दिसून येत नाही.’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यापीठाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला.
शैक्षणिक धोरण उद्यमशील, सर्जनशील : राज्यपाल
राज्यपाल रमेश बैस म्हणाले, ब्रिटिशांचे शैक्षणिक धोरण हे केवळ नोकर करण्यापुरते होते; परंतु, देशाचे पहिल्यांदाच उद्योजकता, नावीन्य, संशोधन, सर्जनशील विचार आणि क्रिटिकल थिंकिंगवर भर देणारे शैक्षणिक धोरण आणले गेले आहे. यावेळी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार’ जाहीर झालेल्यांचे त्यांनी अभिनंदन केले.