हक्काची पेन्शन, सुटी मंजूर करून देण्यासाठीही लाच; मग पगार कशासाठी?
By योगेश पांडे | Updated: March 11, 2023 08:00 IST2023-03-11T08:00:00+5:302023-03-11T08:00:15+5:30
Nagpur News लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये काही प्रमाणात जास्त कारवाया करण्यात आल्या आहेत. सव्वा दोन महिन्यांत २७ जण विविध सापळ्यांत अडकले असून १८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

हक्काची पेन्शन, सुटी मंजूर करून देण्यासाठीही लाच; मग पगार कशासाठी?
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये काही प्रमाणात जास्त कारवाया करण्यात आल्या आहेत. सव्वा दोन महिन्यांत २७ जण विविध सापळ्यांत अडकले असून १८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हक्काची पेन्शन, सुटी मंजूर करून देण्यासाठीही लाच मागण्यात आली असून अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेतन कशासाठी देण्यात येते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे १ जानेवारी २०२३ ते १० मार्च २०२३ या कालावधीत १८ सापळे रचण्यात आले. त्यात २७ अधिकारी-कर्मचारी अडकले.
पाचशे रुपयांपासून लाखाहून अधिकची लाच
या वर्षी अडकलेल्या प्रकरणांमध्ये अगदी पाचशे रुपयांपासून ते एक लाखांहून अधिक रकमेची लाच स्विकारताना आरोपींना अटक करण्यात आली आहे. कांद्री चेकपोस्ट येथे तर मोटर वाहन निरीक्षकाने पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तर रामटेक तालुक्यातील बोथीया पालोरा येथील सरपंचाला १.३२ लाखांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले होते. १८ गुन्ह्यांमध्ये आरोपींना ४ लाख ४६ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
या कारणांसाठी घेतल्या गेली लाच
- सेवानिवृत्तीनंतर शिल्लक अर्जित रजेचे बिल काढुन देण्यासाठी
- सिमेंट मार्ग बांधल्यावर देयक मंजूर करण्यासाठी
- पदोन्नतीचा अर्ज पुढे सरकविण्यासाठी
- गटार, नालीसफाईच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी
- अटक टाळण्यासाठी
- चेकपोस्टवर वाहनाला एन्ट्री देण्यासाठी
- शेताचा फेरफार लवकर करून देण्यासाठी
- शेतात वीज जोडणी लवकर मिळण्यासाठी
- वैद्यकीय रजा कालावधीतील वेतन जारी करण्यासाठी
महसूल विभागात सर्वाधिक सापळे
या वर्षातील सव्वा दोन महिन्यांतील सर्वाधिक सापळे हे महसूल विभागात झाले. पाच सापळ्यांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली. तर पंचायत समिती व नगरपरिषदेतील सापळ्यांनंतर आरोपींच्या विरोधात अनुक्रमे चार व तीन गुन्हे दाखल करण्यात आले.